For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवादाविरोधात राजनाथांची पंचसूत्री

06:05 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादाविरोधात राजनाथांची पंचसूत्री
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

दहशतवाद ही केवळ भारताची समस्या नसून ती साऱ्या जगाची आहे. त्यामुळे विश्वसमुदायाने एकत्रितरित्या या संकटाला संपविले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती, पहलगाम हल्ला आणि सिंदूर अभियानाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केली आहे. दहशतवाद ही मानवतेला लागलेली कीड आहे. क्रांतीच्या भ्रामक कल्पना, धर्मासाठीच्या हौतात्म्याशी जोडलेली अंधश्रद्धा आणि हिंसाचाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी दुष्प्रचाराच्या माध्यमातून चाललेला खटाटोप यामुळे ही कीड फोफावते. जी कृती एका माणसासाठी दहशतवाद असते, तीच कृती दुसऱ्या माणसासाठी स्वातंत्र्यलढा असू शकते, ही समजूत घातक आहे. कोणत्याही कारणासाठीचा दहशतवाद हा अंतिमत: मानवतेला धोकाच असतो. त्यामुळे त्यामध्ये चांगला आणि वाईट अशी वर्गवारी नको, असे आवाहन यांनी केले.

प्रथम दहशतवादाची नेमकी व्याख्या ठरली पाहिजे. नंतर केवळ दहशतवादी किंवा त्यांच्या संघटनांनाच नव्हे, तर अशा दहशतवाद पोसणाऱ्या देशांचा आर्थिक पुरवठा बंद केला पाहिजे. पाकिस्तान त्याला मिळालेल्या आर्थिक साहाय्याचा उपयोग दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपली लष्करी ताकद वाढविण्यासाठी करीत आहे. हे त्याला साहाय्य करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. तिसरा भाग असा, की पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नियंत्रणात असली पाहिजेत. कारण पाकिस्तान अण्वस्त्रांच्या आड दहशतवाद पोसत आहे. चौथा मुद्दा असा की काही देश आपल्या ‘अनौरस अपत्यांना’ पुढे करुन शेजारी देशांमध्ये अस्थिरता निर्माण करीत आहेत. अशा देशांवर नियंत्रण आणावयास हवे. पाचवा मुद्दा असा की आज पाकिस्तान पुरस्कृत दहशवाद्यांकडे अत्याधुनिक जैविक आणि इतर शस्त्रे आहेत. त्यामुळे संपूर्ण विश्वसमुदायाने दहशतवाद्यांविरोधात एकत्र आले पाहिजे, अशी पंचसूत्री राजनाथसिंग यांनी यावेळी मांडली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.