For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजनाथ सिंह यांची भूमिका अत्यंत योग्य

06:37 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
राजनाथ सिंह यांची भूमिका अत्यंत योग्य
Advertisement

एससीओ’च्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी न करण्याचे एस. जयशंकर यांच्याकडून पूर्ण समर्थन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताकडून जबर दणका खाऊनही पाकिस्तान दहशतवादाचे समर्थन करण्याची आपली भूमिका सोडत नाही, हे चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन किंवा एससीओ संस्थेने आयोजित केलेल्या संरक्षण मंत्र्याच्या परिषदेत स्पष्ट झाले आहे. या परिषदेच्या संयुक्त निवेदनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे या परिषदेला उपस्थित राहिलेले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. त्यांची ही भूमिका अत्यंत योग्य आहे, अशा शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे समर्थन केले आहे.

Advertisement

चीनच्या क्विंगदाओ येथे ही परिषद गुरुवारी पार पडली. परिषदेच्या शेवटच्या दिवशी प्रथेप्रमाणे सर्व सदस्य देशांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले जाणार होते. तथापि, निवेदनाची भाषा आणि मांडणी या संदर्भात तीव्र मतभेद झाले होते. परिषदेने दहशतवादाविरोधात एकमुखी निवेदन दिले पाहिजे. तसेच पहलगाम हल्ल्याचा निषेध या निवेदनात झाला पाहिजे, अशी स्पष्ट मागण्या राजनाथ सिंह यांनी केल्या होत्या. मात्र, निवेदनात दहशतवाद आणि पहलगाम या दोन्हींचा उल्लेखही करण्यात आला नव्हता. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. परिणामी, हे निवेदनच बारगळले.

दहशतवादाविरोधात संघर्षासाठीच...

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन ही अनेक देशांची संघटना दहशतवादाला विरोध करण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. तथापि, पाकिस्तानला पंखाखाली घेण्यासाठी या संघटनेतील काही देश दहशतवादाचा उल्लेखही टाळत आहेत. अशाप्रकारे या संघटनेने आपल्या मूळ उद्देशापासून अंतर राखल्याचे दिसून आल्यानेच राजनाथ सिंह यांनी निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता.

निवेदन अखेर बारगळले

भारताने ठाम भूमिका घेतल्याने पाकिस्तान आणि चीन यांचा भारताला अडकविण्याचा डाव फसला होता. परिणामी, एसीओ संरक्षण मंत्री परिषदेने संयुक्त निवेदन प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या निश्चयी धोरणामुळे हा निर्णय परिषदेला घ्यावा लागला. यावरून आता भारत दहशतवादाच्या संदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्टपणे दिसून आले आहे.

भारताच्या भूमिकेत सातत्य

भारताने दहशतवादाला नेहमीच विरोध केला आहे. दहशतवाद, मग तो कोणत्याही कारणास्तव असला, तरी तो समर्थनीय ठरता कामा नये, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. भारताने प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातूत ती ठामपणे आणि सातत्याने मांडली आहे. पाकिस्तान हा देश धर्मांध दहशतवादाचे जागतिक केंद्र आहे. पाकिस्तानच्या या दहशतवादाचा भारताला सर्वाधिक त्रास होत आहे. केवळ भारतालाच नव्हे, तर जगातील अनेक देशांना पाकिस्तानमुळे हा त्रास होत आहे. अमेरिकेत 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार ओसामा बिन लादेन हा शेवटी पाकिस्तानमध्येच सापडला होता, अशाप्रकारे पाकिस्तान आणि दहशतवाद हे कसे एकजीव आहेत, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे विश्वसमुदायाने एकत्र येऊन दहशतवाद आणि त्याला पोसणारे देश यांच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे हे भारताचे स्पष्ट म्हणणे आहे. भारत स्वत: आता दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशक्तीचे धोरण अवलंबत असून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात चालविलेल्या ‘सिंदूर’ अभियानातून भारत आता अधिक सहन करणार नाही, हा संदेश पाकिस्तानसह जगालाही दिला आहे. ही भारताची सातत्यपूर्ण भूमिका आहे.

Advertisement
Tags :

.