राजनाथ सिंह यांची सभा पावसामुळे रद्द
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील छाप्रा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची बुधवारी होणारी निवडणूक प्रचारसभा रद्द करावी लागली. भाजप उमेदवार छोटी कुमारी यांच्या प्रचारार्थ छाप्रा विधानसभा मतदारसंघातील फाकुली गावात त्यांची सभा होणार होती. तथापि, कार्यक्रमाच्या दोन तास आधी सतत पाऊस सुरू झाल्यामुळे मैदान आणि हेलिपॅड चिखलाने भरले होते. संरक्षणमंत्र्यांचे हेलिकॉप्टर येथील तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरणार होते. मात्र, हे हेलिपॅडही पाण्याखाली गेल्याने व खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरना उड्डाण किंवा उतरण्याची परवानगी नव्हती. परिस्थिती इतकी गंभीर होती की सुरक्षा व्यवस्थेसाठी आणलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका देखील चिखलात अडकल्या होत्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना वाहने बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. सभेचे नियोजन करण्यात आलेल्या मैदानावरही पाणी साचल्याने लोकांना बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी जागा नव्हती.