राजीव शुक्ला बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष होणार
विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी वयोमर्यादेमुळे पद सोडणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रॉजर बिन्नी पुढील महिन्यात 70 वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुभवी क्रिकेट प्रशासक राजीव शुक्ला अंतरिम अध्यक्षपदावर नियुक्त होतील, अशी माहिती बीसीसीआयच्या स्tgत्रांनी सोमवारी दिली.
2022 मध्ये सौरव गांगुली यांच्याकडून बोर्डाचे अध्यक्षपद भूषवणारे बिन्नी 19 जुलै रोजी 70 वर्षांचे होतील. त्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसाठी असणारी वयोमर्यादा ओलांडली जाणार आहे. 65 वर्षीय शुक्ला सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. हे पद ते 2020 पासून भूषवत आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन निवडणूक होईपर्यंत ते बीसीसीआयचे सक्रिय अध्यक्ष असतील. परंपरेनुसार अशा परिस्थितीत सर्वात वरिष्ठ पदाधिकारी पदभार स्वीकारतात. सप्टेंबरमध्ये नवीन निवडणूक होईपर्यंत ते (शुक्ला) ही भूमिका बजावतील, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. अलिकडेच सी. के. खन्ना यांनी 2017 ते 2019 पर्यंत बीसीसीआयचे कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने 33 महिने बोर्डाचे व्यवस्थापन केले होते. तीन वर्षांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बिन्नी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. महान खेळाडूंमध्ये गणले जाणारे हे माजी अष्टपैलु खेळाडू कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. नंतर त्यांनी 2000 च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषविले होते.