राजीव पिकळे यांची स्वत:वर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या
कारवार : येथील सुप्रसिद्ध पिकळे नर्सिंग होममध्ये औषध विभागात सेवा बजावणाऱ्या राजीव (राजू) पिकळे यांनी शुक्रवारी अंकोला तालुक्यातील अवरसा येथील आपल्या राहत्या घरी डबलबॅरल गनने स्वत:वर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने कारवार आणि अंकोला तालुक्यात खळबळ माजली आहे. गेली अनेक वर्षे रुग्णांची सेवा केलेल्या राजीव पकळे यांच्या आत्महत्येबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, येथे डॉक्टरांचे घराणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिकळे कुटुंबीयांचे येथील पिकळे रोडवर पिकळे नर्सिंग होम आहे. या नर्सिंग होममध्ये पिकळे कुटुंबातील चौथी पिढी वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावत आहे. या होममध्ये पिकळे कुटुंबातील राजीव पिकळे हे औषध विभागात सेवा बजावत होते. 15 दिवसांपूर्वी एका रुग्णाच्या नातेवाईकाने राजीव पिकळे यांच्यावर तारीख उलटून गेलेली औषधे दिल्याचा गंभीर आरोप केला होता.
त्यावेळी राजीव पिकळे आणि रुग्णाच्या त्या नातेवाईकात वाद झाला होता. रुग्णांच्या नातेवाईकाने वादाचा व्हिडिओ केला होता. त्यावेळी राजीव पिकळे यांनी नजरचुकीने ही घटना घडली आहे, असे सांगून रुग्णाच्या नातेवाईकांकडे माफी मागितली होती. तरीसुद्धा त्या नातेवाईकाने तो व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. आपल्या एका चुकीमुळे काही पिढ्यांची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सुप्रसिद्ध नर्सिंग होमची बदनामी झाली, असा समज करून घेऊन राजीव नैराश्यग्रस्त झाले होते. येथील माजी नगराध्यक्ष आणि नितीन पिकळेसह इतरांनी राजीव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरीसुद्धा राजीव यांनी शुक्रवारी अंकोला तालुक्यातील अवरसा येथील राहत्या घरी डबलबॅरल गनने स्वत:वर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्यांचा मृतदेह घरासमोरील तुळसी वृंदावनजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्र
आत्महत्येपूर्वी राजीव पिकळे यांनी मृत्यूपत्र लिहिले असून या पत्रामध्ये त्यांनी आपल्या हत्येला कुणालाही जबाबदार न धरता आपणाला जबाबदार धरावे, असे लिहिले आहे, असे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारवार जिल्हा पोलीस प्रमुख दीपन, डीवायएसपी गिरीश आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत्यूपत्रामधील हस्ताक्षरांची पाहणी करीत आहेत, असे सांगण्यात आले