राजीव कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त
सुशील चंद्रा यांच्या जागी 15 मे पासून होणार रुजू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 15 मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ 14 मे 2022 रोजी पूर्ण होत असल्याने कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करून राजीव यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीची घोषणा केली.
राजीव कुमार हे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. त्यांच्या नियुक्तीबाबत कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे बिहार/झारखंड केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. ते फेब्रुवारी 2020 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून रुजू झाले. निवडणूक आयोगात पदभार स्वीकारण्यापूर्वी राजीव कुमार सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष होते. ते एप्रिल 2020 मध्ये पीईएसबी (सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ) चे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते.
प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव
राजीव कुमार हे अत्यंत अनुभवी आहेत. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत 36 वर्षांपेक्षा जास्त सेवा केली आहे. या काळात त्यांनी सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रात केंद्र आणि राज्याच्या विविध मंत्रालयांमध्ये काम केले आहे. राजीव कुमार यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एसबीआय, नाबार्डवर संचालक म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांनी इकॉनॉमिक इंटेलिजन्स कौन्सिल आणि आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदचे (एफएसडीसी) सदस्य म्हणूनही काम केले आहे.
बनावट कंपन्यांवरील कारवाईसाठी चर्चेत
राजीव कुमार यांनी तीन लाखांहून अधिक बनावट कंपन्यांवर कारवाई केल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी वित्तीय सेवा क्षेत्रावर रितसर देखरेख ठेवली होती. बँकिंग सेवा क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. बनावट इक्विटी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱया सुमारे 3.38 लाख बनावट कंपन्यांची बँक खाती त्यांनी गोठवली होती.