राजिंदर गुप्ता ‘आप’चे राज्यसभेचे उमेदवार
वृत्तसंस्था/ चंदीगड
आम आदमी पक्षाने (आप) पंजाबमधील आगामी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्योगपती राजिंदर गुप्ता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही पोटनिवडणूक 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ट्रायडंट ग्रुपचे मानद अध्यक्ष असलेले गुप्ता यांनी अलिकडेच राज्य आर्थिक धोरण आणि नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आणि कालीदेवी मंदिर सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ‘आप’ त्यांना पोटनिवडणुकीत उभे करू शकते अशी अटकळ व्यक्त केली जात होती. आप नेते संजीव अरोरा यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. पंजाब विधानसभेत निवडून आल्यानंतर अरोरा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. राज्यसभेच्या सदस्य म्हणून अरोरा यांचा कार्यकाळ 9 एप्रिल 2028 रोजी संपणार होता. ते सध्या मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत आहेत.