For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजगंगा शुगरच्या थकीत ऊस बिलांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात; उमरगा येथील आंदोलनाला यश

03:11 PM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजगंगा शुगरच्या थकीत ऊस बिलांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात  उमरगा येथील आंदोलनाला यश
Advertisement
धाराशिव, प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील राजगंगा शुगरकडील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत ऊस बिलांची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

राजगंगा शुगरकडील थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उमरगा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान दोन शेतकरी तहसील कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर चढले होते. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले.

Advertisement

या आंदोलनाची दखल घेत आमदार प्रवीण स्वामी, राजगंगा शुगरचे संचालक आणि तहसीलदार गोविंद येरमे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांची थकीत ऊस बिलांची रक्कम गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

या आश्वासनानुसार आता प्रत्यक्ष रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, उर्वरित थकीत रक्कमही लवकर जमा होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.