राजेश लाटकर आता महाविकासचे पुरस्कृत उमेदवार
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची घोषणा : काँग्रेस कमिटीत मविआचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न : झाले गेले विसरून कामाला लागण्याचे आवाहन
कोल्हापूर/ प्रतिनिधी :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून अपक्ष लढणारे राजेश लाटकर हे आता महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील, अशी घोषणा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केली. मंगळवारी सायंकाळी काँग्रेस कमिटीमध्ये मविआच्या झालेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, अपक्ष उमेदवार लाटकर यांना महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा असून ते महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी झाले गेले विसरून लाटकर यांच्या प्रचारासाठी जोमाने कामाला लागावे. लाटकर यांच्या विजयासाठी कष्ट घ्यावेत. जीवाचे रान करून त्यांना निवडून आणावे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. झाले गेले सर्व विसरून जाऊन सर्वांनी आता एक संघपणे लाटकर यांच्या विजयासाठी काम करावे, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी केले. आमदार सतेज पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीला इंडिया आघाडी, महाविकास आघाडीच्या सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकत्र सामोरे जायचे आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला आहे.
यावेळी उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक सुखवंत ब्रार, शिवसेना उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर. के. पवार, आमदार जयंत आजगावकर, सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, गोकुळचे विश्वास पाटील, कॉ. दिलीप पवार, व्यंकटप्पा भोसले चंद्रकांत यादव, प्रा. टी. एस. पाटील, बाबासाहेब देवकर, दुर्वास कदम, संजय मोहिते, सुनिल मोदी, रविकिरण इंगवले, तौफिक मुल्लाणी, हेमलता माने,लिला धुमाळ, सुमन ढेरे,सरला पाटील,संध्या घोटणे, वैशाली महाडिक,शोभा कवाळे, शुभांगी साखरे, विद्या घोरपडे आदी उपस्थित होते.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : राजेश लाटकर
महाविकास आघाडीने पाठिंबा देऊन माझ्या सन्मान वाढवला आहे. मी आता अपक्ष असलो तरी महाविकास पुरस्कृत उमेदवार असुन माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला यथो किंचितही तडा जाऊ देणार नाही, अशी सर्वांसमोर ग्वाही देतो. निवडणुकीत मला प्रेशर कुकर चिन्ह मिळाले असले तरी महाविकास, काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने विजय निश्चित असल्याचे उत्तर मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांनी सांगितले.
डाळ चांगली शिजली पाहीजे
राजेश लाटकर यांना प्रेशर कुकर चिन्ह मिळाले आहे. ते आता मविआचे पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेशर कुकरमध्ये चागंली डाळ शिजली पाहीजे, असे खासदार शाहू छत्रपती यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.