राजेश कुमार सिंह नवीन संरक्षण सचिव
केरळ केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार सिंह यांना देशाचे नवे संरक्षण सचिव बनवण्यात आले आहे. त्यांनी शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉकमध्ये असलेल्या संरक्षण मंत्रालयात कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जात श्रद्धांजली वाहिली. राजेश कुमार सिंह हे केरळ केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. संरक्षण सचिव होण्यापूर्वी ते संरक्षण मंत्रालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदाचा कार्यभार सांभाळत होते.
राजेश कुमार यांनी यापूर्वी केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयात संचालक, बांधकाम आणि शहरी वाहतूक, आयुक्त (जमीन) - डीडीए, सहसचिव - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, सहसचिव - कृषी विभाग आणि इतर अनेक पदांवर काम केले. याशिवाय त्यांनी राज्य सरकारमध्येही काम केले आहे. त्यांनी राज्य सरकारमध्ये नगरविकास सचिव आणि अलीकडे केरळ सरकारचे वित्त सचिव म्हणून महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
राजेश कुमार सिंग यांनी आंध्रप्रदेश केडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी गिरीधर अरमाने यांची जागा घेतली. अरमाने हे 31 ऑक्टोबर 2024 रोजी संरक्षण सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ऑगस्ट महिन्यात सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचे विभाग बदलले होते.