For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर IT पार्क आणि हद्दवाढ, विधीमंडळात Rajesh Kshirsagar यांनी कोणते दोन प्रश्न विचारले?

06:22 PM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कोल्हापूर it पार्क आणि हद्दवाढ  विधीमंडळात rajesh kshirsagar यांनी कोणते दोन प्रश्न विचारले
Advertisement

कोल्हापुरात आय.टी.पार्क निर्मितीसाठी बैठक घ्या, आमदार क्षीरसागर यांची मागणी

Advertisement

मुंबई : कोल्हापुरात आय. टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित असून, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत अधिवेशनानंतर पहिल्याच आठवड्यात मंत्रालय स्तरावर बैठक घेवून आय.टी.पार्क निर्मितीसाठी सुमारे २०० एकर जागा वितरीत करण्यात येईल का, असा प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला.

कोल्हापूरच्या आय.टी.पार्क आणि हद्दवाढीसंदर्भात आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे.

Advertisement

आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना होणार आहे. पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. यासाठी केंद्र शासनाने नीती आयोग व राज्य शासनाने मित्र संस्थेची स्थापना केली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली. यामध्ये फौंड्री, वस्त्रोद्योग, कृषि, आय.टी., पर्यटन या पाच क्षेत्रांचा विकास करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धोरणात्मक योजना आखलेल्या आहेत.

महा स्ट्राइड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवतानाच आयटी क्षेत्राशी संलग्न असणारा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. या डेटा सेंटरसोबतच आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्यास आयटी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल.

कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क येथे आरोग्य व कृषि विभागाच्या जागा आय.टी.सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच गेले ८२ वर्षे शहराची हद्दवाढ झाली नसल्याने आय.टी.सह विविध क्षेत्रांच्या विकासासाठी जागा मिळत नाही त्यामुळे हद्दवाढ करण्यात येईल काय, असाही प्रश्न उपस्थित केला.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची मागणी पुन्हा केली. यावर तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी कोल्हापुरात आय.टी.पार्क निर्मितीसाठी बैठक घेण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. यावर बैठक घेण्याची ग्वाही मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली.

Advertisement
Tags :

.