Rajesh Kshirsagar | आमदार राजेश क्षीरसागर 'टक्केवारी' वाद: लाचलुचपत विभागाकडे तक्रार; 'त्या' दोन व्यक्तींची सर्वात आधी होणार चौकशी!
कोल्हापूर -आमदार राजेश क्षीरसागर व महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये टक्केवारीची झालेली चर्चा सर्व माध्यमांतून पुढे आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महासंचालकांकडेही तक्रार अर्ज देण्यात आला आहे. लाचलुचपत विभाग महासंचालकांच्या परवानगीनंतरच ही चौकशी होणार आहे.
टक्केवारीसंदर्भात, विविध माध्यमांमध्ये ठळक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या चित्रफितीवरून प्रशासनाकडून पुढील कारवाई कशी व कधी केली जाईल हा भाग पुढचा आहे. पण लाच लुचपत विभागाकडे जर स्वतंत्र तक्रार अर्ज आला व त्याला महासंचालकांनी मान्यतादिली तर पुढील चौकशी केली जाते. टक्केवारीच्या या चित्रफितीमध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टरने आमदार राजेश क्षीरसागर यांना कुणाकुणाला पैसे द्यावे लागले, हे सांगितले आहे.
त्यात सुहास व अन्य एका व्यक्तीचा उल्लेख आहे. या दोघांना आपण एक एक लाख रुपये रोख दिले आहेत, असे कॉन्ट्रॅक्टरने सांगितले आहे. त्यामुळे चौकशीला मान्यता मिळाल्यानंतर पहिल्यांदा १ लाख रुपये ज्यांनी घेतले त्यांच्यापासून चौकशीला सुरुवात होणार आहे. आणि हा व्यवहार बँकेमार्फत झाला असल्याने या दोघांची चौकशी पहिल्यांदा होणार आहे. त्यांना १ लाख रुपये मिळाल्यांची जी नोंद आहे. त्यानुसार हे १ लाख रुपये कोणी, कशाला व कोणत्या कारणासाठी दिले हे त्यांना स्पष्ट सांगावेच लागणार आहे.