कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satej Patil-Rajesh Kshirsagar : राजकीय सलगी की विरोधकांना कोपरखळी?

03:57 PM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवसेना आणि भाजपच्या व्यासपीठावरही त्यांनी एकत्र हजेरी लावली

Advertisement

By : संतोष पाटील

Advertisement

कोल्हापूर : गणेशोत्सव असो वा कोणतेही गर्दीचे ठिकाण, म्हणजे राजकारण्यांसाठी गर्दी कॅश करण्याचे आवडते ठिकाण असते. गणेशोत्सवात तर आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला बिटकुळ्या दाखवण्याची नामी संधी असते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी एकमेकांच्या हातात हात घालून महापालिका, शिवसेना आणि भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. ही हजेरी आपापल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी हाणलेली कोपरखळीच होती.

गणेशोत्सवातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. दोघांनी स्मितवदनांनी हस्तांदोलन केले. ‘राजेश, तब्येतीची काळजी घ्या,’ असा काळजीचा सूरही सतेज पाटील यांच्या मुखातून आला. इतकंच नाही, तर शिवसेना आणि भाजपच्या व्यासपीठावरही त्यांनी एकत्र हजेरी लावली.

तुम्ही भाजपचे मूळचे आहात, त्यामुळे मला येण्यास काहीच अडचण नाही,’ असे सतेज पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना म्हटले. याचवेळी व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक अथवा आमदार अमल महाडिक असते तर सतेज पाटील गेले असते का? ‘तुम्ही भाजपचे मूळचे,’ हा टोला कुणाला होता, याची चर्चा आता रंगली आहे.

राजेश क्षीरसागर यांच्यासोबत स्वागत मंडपांना भेटी देताना सत्यजित कदम यांच्या स्वागत मंडपात जाणे मात्र सतेज पाटील यांनी चाणाक्षपणे टाळले. सतेज पाटील यांनी उपस्थिती लावली म्हटल्यावर भाजपच्या व्यासपीठावर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनाही जावे लागले. हे सगळे वरवर सहज घडल्यासारखे वाटत असले तरी यामागे अनेक संकेत, राजकीय कोपरखळ्या, इशारे दडलेले आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात सुमारे 40 हजार मतांचा गठ्ठा असलेला कसबा बावडा परिसर हा महत्वाचा गड आहे. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांना बावड्यातून साथ मिळाली. पण 2019 च्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत चंद्रकांत जाधव यांना भाजपमधून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये घेऊन उत्तरचे आमदार केले.

त्यानंतर राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय वितुष्ट वाढले. पण 2024 च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा टोकाचा विरोध असतानाही राजेश क्षीरसागर पुन्हा निवडून आले. मधल्या काळात पाटील यांचे खास कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात गेले.

या घटनाक्रमानंतर सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर हे एकमेकांना जीवाभावाच्या मित्रासारखे भेटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले. सतेज पाटील यांना सातत्याने टार्गेट करणाऱ्या सत्यजित कदम यांनाही या हस्तांदोलनाने चिडवण्याचा प्रयत्न असू शकतो.

यात पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील अशा दोन्ही इर्षेच्या राजकारणाची किनार आहे. ती अगदी सहज आणि नैसर्गिकरित्या घडली असेल तरीही याचे राजकीय पैलू न लपणारे असेच आहेत. 2009 ते 2019 पर्यंत असणाऱ्या बावड्यातील ‘समझोता एक्सप्रेस’ची नवी नांदी नव्हे ना?

सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली. ती लावताना ‘तुम्ही सर्व जुने आणि मूळचे भाजपवासी आहात, त्यामुळे येण्यास अडचण नाही,’ हे सतेज पाटील यांचे वक्तव्य उत्स्फूर्तपणे आले असले तरी ते सूचक वक्तव्य असून महाडिक गटाकडेच रोख करणारे होते.

समृद्ध राजकारणाची पायवाट

सतेज पाटील यांनी राजारामपुरी आगमन निवडणुकीत हजेरी लावून गाण्यावर ठेका धरला. तसाच तो विसर्जन मिरवणुकीतही पापाची तिकटी येथे धरला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनीही मिरजकर तिकटीला उद्घाटन करताना गाण्यावर ताल धरला. राजेश क्षीरसागर यांनी मित्रप्रेम मंडळाच्या ट्रॅक्टरचे सारथ्य केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी एकमेकांना खुमखुमी दाखवतील, राजकीय इर्षा करतील, असा मागील अनुभव होता. मात्र, एकमेकांची आस्थेवाईक चौकशी करून हातात हात घालत विरोधकांच्या व्यासपीठावर हजेरी लावली. या मागील छुपे किंवा उघड हेतू काहीही असो, मात्र नेत्यांची ही कृती कोल्हापुरातील राजकारण समृद्धतेकडे जात असल्याचे लक्षण आहे, असेच म्हणावे लागेल.

राजकारणात काहीही अशक्य नाही, दाखवण्याचा प्रयत्न

सतेज पाटील यांचे बहुसंख्य पाठीराखे हे शिवसेना (शिंदे गटात) गेले आहेत. आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाचे प्रमुख शिलेदार आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारी आणि इतर बाबतीत पक्षात त्यांचा अंतिम शब्द असणार आहे.

सतेज पाटील यांचे पूर्वाश्रमीचे पाठीराखे आता क्षीरसागर यांच्या पक्षाच्या मंडपात असले तरी ‘तुमचा नेता आणि मी आमच्यात कोणतेही वितुष्ट नाही’, भाजपचे पदाधिकारी सतेज पाटील यांना सन्मानाने व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण देतात आणि सतेज पाटील अगदी सहजपणे त्यांच्या मंडपात जाऊन स्वागत स्वीकारतात.

राजकारणात काहीही अशक्य नाही, वरच्या पातळीवर आम्ही सगळे एकच आहोत, हेच या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न असावा. सतेज पाटील यांनी अगदी सहज-उत्स्फूर्तपणे केलेली ही कृती असली तरी यातून जो जायचा तो संदेश योग्य ठिकाणी गेला आहे.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS# political parties#Rajesh Kshirsagar#satej patil#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaShivSena Shinde faction
Next Article