For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या 2 दादांमध्ये तिसरा कौन?, चंद्रकांत पाटील अन् क्षीरसागर यांच्यात रंगणार कलगीतुरा

11:10 AM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur politics  कोल्हापूरच्या 2 दादांमध्ये तिसरा कौन   चंद्रकांत पाटील अन् क्षीरसागर यांच्यात रंगणार कलगीतुरा
Advertisement

भाजपने कोल्हापूर उत्तरमधून स्वतंत्रपणे निवडणूक लढत जोरदार लढत दिली

Advertisement

By : संतोष पाटील

कोल्हापूर : विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीपासूनच चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील राजकीय संघर्ष लपलेला नाही. या संघर्षाने कधी तीव्र रुप घेतले तर की सौम्यीकरणही झाल्याचे कोल्हापूरकरांनी पाहिले आहे. 2014 ला युती तुटल्यानंतर भाजपने कोल्हापूर उत्तरमधून स्वतंत्रपणे निवडणूक लढत जोरदार लढत दिली.

Advertisement

त्यानंतर 2015 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने ताराराणी आघाडीसोबत युती केली. भाजप आणि ताराराणी आघाडीने मिळून 81 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी फक्त 8 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. आघाडीला मिळून तब्बल 99 हजार 969 मिळाली होती.

यामध्ये ताराराणी आघाडीला 57 हजार 767 तर भाजपला 41 हजार 966 मते मिळाली होती. एकत्रित मतांची टक्केवारी 31.88 टक्के होती. आघाडीने तब्बल 32 जागा जिंकल्या होत्या. यातील ताराराणी आघाडीने 37 जागा लढवून 19 जागांवर विजय मिळवला तर भाजपने 44 जागा लढवत 13 जागा जिंकल्या होत्या.

41 मतांचा जादूई आकडा गाठण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीला 9 नगरसेवकांची कमी होती. याचवेळी स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेनेने 81 जागा लढवल्या. त्यातील 45 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. 43 हजार 541 मते मिळवली. याची टक्केवारी 13.91 टक्के इतकी होती. 81 पैकी 4 जागांवर शिवसेनेला यश मिळाले. तर 3 अपक्ष निवडून आले होते.

शिवसेनेने साथ दिली असती तर महापौर भाजपचा झाला असता, या अर्थानेच मंत्री चंद्रकांत पाटील म्हणत आहेत, की भाजप आघाडी 32 शिवसेना 4 असे 36 आणि अपक्ष 3 मिळून 39 पर्यंत आघाडी गेली असती. उर्वरित काही नगरसेवक त्यावेळी राज्यातील हेवीवेट मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात होते.

शिवसेनेने ताकद दिली असती तर कदाचित चंद्रकांत पाटील यांचे महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न सत्यात उतरले असते. मात्र, राजकारणात ‘जर-तर’ शब्दाला काही अर्थ नसतो. तरीही नेत्यांनी केलेली वक्तव्ये ही मागील मागील आणि पुढील राजकारणाचे संदर्भ स्पष्ट करणारी असतात.

त्यामुळेच महापौर पदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्व आहे. गेल्या दोन महिन्यात ताराराणी आघाडीच्या बहुतांश नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पसंती देत प्रवेश केला आहे. यात राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नगरसेवकांचाही समावेश आहे. एकट्याच्या जोरावर महापालिकेवर सत्ता आणण्याची ताकद राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी-दोन्ही शिवसेना, ताराराणी आघाडी किंवा भाजपमध्ये कालपण नव्हती आणि आजही नाही.

निवडणूकपूर्व युती किंवा निवडून आल्यानंतर एकत्र येणे तसेच काही प्रभाग एकमेकांत मांडवली करुन आपसात ताकद देणे, असे पर्याय आहेत. महायुती म्हणून एकत्र लढले तरी शिवसेना भाजपच्या तोडीच्या जागा घेईल. याचा परिणाम आघाडीने निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महापौरासह इतर पदवाटपावर होणार आहे.

त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार क्षीरसागर यांना मागील आठवण करुन दिली असावी. राजेश क्षीरसागर यांच्याकडून येणारी प्रतिक्रिया त्यानंतरच्या क्रियेवरच महायुतीच्या महापालिकेतील राजकारणाची दिशा स्पष्ट होईल.

आताच का झाली आठवण?

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या भाजप-शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन केली. मात्र महापालिकेच्या राजकारणात भाजप आणि शिवसेनेचा सवता सुभा कायम राहिला. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणाचा परिणाम महापालिकेत उमटला.

2015 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले. मात्र निवडणुकीनंतर एकत्रही आले. इतकेच नाही तर शहरातील अनेक प्रभागात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी अंडरस्टॅन्डींग ठेवत एकमेकाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची पूरक भूमिकाही घेतल्याचे आकडेवारी सांगते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीपूर्वी, प्रत्यक्ष निवडणुकीत आणि निवडून आल्यानंतरही राजेश क्षीरसागर यांच्याकडून अशा मदतीची अपेक्षा असावी. मागील निवडणुकीत झालेली ही चूक पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न म्हणून मागील आठवण जागी केली, की एक प्रकारचा छुपा राजकीय इशारा होता, हे लवकरच स्पष्ट होईल.

आमदार क्षीरसागर यांनी साथ दिली असती तर कदाचित 2015 मध्येच भाजपचा महापौर झाला असता,’ असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यातून त्यांनी जुन्या जखमेची खपली काढली. महिन्याभरात काँग्रेस आणि विशेषत: ताराराणी आघाडीचे आजी-माजी नगरसेवक शिंदे शिवसेनेत जात असल्याचे याला एक कारण आहे. कोल्हापूरच्या या दोन ‘दादां’मधील हा छुपा संघर्ष की राजकीय स्पर्धा, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Advertisement
Tags :

.