Sangli News : आ. जयंत पाटील यांना चांडाळ चौकडीने घेरले : राजेंद्र पाटील
वाळवा : आमदार जयंत पाटील यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे. त्यामुळे तालुक्यांतील गावागावात पक्षाचे नुकसान होत आहे. राजारामबापू पाटील आणि स्वतः जयंत पाटील यांना सुरुवातीपासूनच बिरोध करणारे लोक सध्या जयंत पाटील यांच्या जवळ आहेत, अशा लोकांना आमचा नेहमी विरोध राहील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आमची निष्ठा अढळ आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या कुठल्या पश्चात जाणार नाही. मात्र पश्नाच्या हिताविरूद्ध काम करणाऱ्या लोकांना आमचा नेहमी विरोध राहील. असे ते म्हणाले. राजारामबापू वारल्यानंतर आमचे वडील गुरुवर्य लालासाहेब पाटील यांना भेटण्यासाठी आमदार जयंत पाटील व त्यांचे बंधू भगत पाटील आले होते.
आमचे बंधू दिलीप पाटील हे ही होते. त्यावेळी आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की राजारामबापू घराण्याला कधीही सोडू नका, राजारामबापूंच्या मुलांच्या पाठीशी तुम्ही कायम रहा. त्यांनी विहीरीत उडी टाकली तरी तुम्हीपण टाका. पण, त्यांना सोडू नका. त्या प्रमाणे आम्ही आजतागायत बागत आलो आहे.
आज आमची तिसरी पिढी बापूंच्या घराण्यासोबत काम करत आहे. पण ज्यांनी बापूंना हयातभर प्रचंड त्रास दिला. ज्यांनी जयंत पाटील राजकारणात येऊ नयेत, म्हणून प्रयत्न केले. तेच आज जयंत पाटील यांच्या अवतीभवती आहेत. ते नेत्यांच्या कानाशी लागून वाळव्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकारणात ढवळाढवळ करीत आहेत.
पाटील म्हणाले, या पिल्लावळीमुळे बापूंच्या निष्ठावंतांना डावलले जात आहे. या गद्दारांना आमचा विरोध आहे. आम्ही राजारामबापू घराण्याचे निष्ठावंत होतो, आहे आणि रहाणार. वेळ आली तर आम्ही घरात बसू पण पक्षातील गद्दाराना नेहमी आमचा सामना करावा लागेल याची जाणीव ठेवावी.