गोवा-केरळमध्ये अनेक समान धागे; राज्यपालपदावरही घटनात्मक भूमिकेला प्राधान्य : राज्यपाल राजेंद्र आर्लेकर
विजय मळीक, केरळ त. भा. वृत्तसेवा : राज्यपालपदाची घटनात्मक जबाबदारी पार पाडताना या पदाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची आपण काळजी घेतो. सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी राज्याची रास्त मागणी आणि भूमिका केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडतो, असे केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी स्पष्ट केले. आर्लेकर हे केरळसोबत तामिळनाडूचेही राज्यपाल आहेत.
मुंबई पीआयबीच्या वतीने आयोजित केरळ दौऱ्यात महाराष्ट्र आणि गोव्यातील पत्रकारांच्या एका गटाने तिरुअनंतपुरम येथील लोकभवनात आर्लेकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या संवादात आर्लेकर यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने आपली भूमिका मांडली. विशेष म्हणजे गोव्याशी असलेले त्यांचे नाते लक्षात घेता पत्रकारांशी संवाद मराठीतून झाला.
आपल्या राजकीय कारकिर्दीत तत्त्वनिष्ठ आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यपालपदाची घटनात्मक भूमिका बजावताना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे राहून जबाबदारीने काम करण्यावर आपला भर असल्याचे आर्लेकर यांनी सांगितले. राज्यपालांच्या घटनात्मक भूमिकेत राज्य सरकारशी समन्वय आणि संविधानिक चौकटीत काम करणे महत्त्वाचे आहे.
केरळच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद
केरळचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारशी खुला संवाद साधण्यावर आपण भर देतो. चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवता येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारी प्रशासन, विकास प्रकल्प, सहकारी संघराज्यवाद यांसह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
केरळने आरोग्य, पर्यटन, शिक्षण तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक सलोख्याच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आर्लेकर यांनी उल्लेख केला. राज्यातील साक्षरता, स्वच्छता, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य ही केरळची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोवा-केरळमध्ये अनेक समान धागे
गोवा आणि केरळमध्ये अनेक बाबतींत साम्य असून दोन्ही राज्यांमध्ये फारसा फरक नसल्याचे आर्लेकर यांनी सांगितले. केरळच्या जनतेची शिस्त, आदरातिथ्य आणि सामाजिक सलोखा ही वैशिष्ट्ये इतर राज्यांसाठीही अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. केरळच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेताना मानवी विकासात शिक्षणाच्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला.
राजेंद्र आर्लेकर हे मूळचे गोव्याचे असून त्यांचा जन्म पणजी येथे झाला आहे. ते गोवा विधानसभेचे माजी सभापती आणि माजी आमदार राहिले आहेत.