ज्येष्ठ मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांना राजधानी पुरस्कार जाहीर
मालवण । प्रतिनिधी
मालवणी भाषेतील ज्येष्ठ कवी रुजारिओ पास्कल पिंटो यांना मानाचा राजधानी पुरस्कार जाहीर झाल्याने मालवणी मुलखात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नव्या युगाचे आद्य कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचे मालगुंड (रत्नागिरी) हे जन्मस्थळ. त्या जन्म स्थळाला आधुनिक कविंची राजधानी असे ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांनी म्हटले होते. म्हणून त्या पुरस्काराचे नामकरण 'राजधानी पुरस्कार' असे पडले आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असून सदर पुरस्काराचे वितरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मालगुंड येथे ८ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यापूर्वी हा मानाचा पुरस्कार कवी अशोक नायगांवकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर कवी सौमित्र, प्रा. निरजा आदी अनेक मान्यवर कवींना प्राप्त झालेला आहे. अस्सल मालवणी बोलीच्या खुमासदार कवीला प्राप्त झालेला हा मात्र पहिलाच पुरस्कार आहे. म्हणून मालवणी मुलखात या पुरस्काराने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक मान्यवरांकडून पिंटो यांचे अभिनंदन होत आहे.रुजारिओ पिंटो हे मराठी, कोकणी, मालवणी आणि हिंदी या चार भाषेत कविता साकारणारे एकमेव कवी असून माऊली, दर्यादेगेर (कोकणी) आम्ही मालवणी, गरो फणसाचो (मालवण) हे कविता संग्रह असून बूमरँग हा त्यांचा कथासंग्रह बराच गाजलेला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एस. वाय. बी. ए. च्या अभ्यासक्रमात झाला आहे. तसेच गोवा राज्याच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा आदी भागात त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम सातत्यपूर्ण होत असतात.