रजत तोरसकरची टेबल टेनिस अश्वमेध स्पर्धेत सुवर्णझेप
मालवण । प्रतिनिधी
मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का.पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी रजत रवीकिरण तोरसकर आणि त्याच्या संघाने नांदेड येथे पार पडलेल्या टेबल टेनिस आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करत अंतिम फेरीत प्रवेश करून सुवर्ण पदकावर मोहर उमटवली. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 22 विद्यापीठांनी भाग घेतला होता. रजत तोरसकर आणि त्याच्या संघाने स्पर्धेत नागपूर विभागातील रामनाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. मागील दोन वर्षात नागपूर संघाने रौप्य आणि रजत पदक पटकावले होते. रजत तोरसकर याने मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमी येथे टेबल टेनिसचे धडे घेतले. नुकत्याच झालेल्या राजस्थान येथील खेलो इंडिया टेबल टेनिस स्पर्धेमध्ये त्यांनी आणि संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.