रजत तोरसकरची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत दुसऱ्यांदा निवड
मालवण | प्रतिनिधी
मालवण टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याची खेलो इंडिया आणि राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. टेबल टेनिसच्या राष्ट्रीय विभागीय स्पर्धा नुकत्याच पाटणा, मध्यप्रदेश येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र ,गुजरात, मध्य प्रदेश ,राजस्थान या राज्यातील विद्यापीठांचा समावेश होता. यामध्ये ७२ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. कु. रजत तोरसकर आणि त्याच्या संघाने या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने उत्कृष्ट खेळी करत अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले. चुरशीची झुंज देत संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या टेबल टेनिस संघाने रौप्य पदक मिळविले. त्यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अंतिम विद्यापीठीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी रजत तोरसकर याला मिळणार आहे. रजतच्या यशाबद्दल मालवण येथे कोळगावकर टेबल टेनिस अकादमीचे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शन विष्णू कोरगावकर, प्रशिक्षक डॉक्टर राहुल पंतवालावलकर, सिंधुदुर्ग टेबल टेनिस संघटनेचे श्री हेमंत वालकर, टोपीवाला हायस्कूल आणि स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयच्या शिक्षक वृंद यांनी रजतला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.