राजस्थानचा चेन्नईवर दणकेबाज विजय
वैभव सूर्यवंशीचे 15 चेंडूत अर्धशतक : सामनावीर नांद्रे बर्गरचे 2 बळी : पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या पदरी निराशा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या आयपीएलमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सने पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई किंग्सचा धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. वैभव सूर्यवंशीचे तडाखेबंद अर्धशतक आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालसह कर्णधार रियान परागच्या कडक बॅटिंगच्या जोरावर राजस्थानने 128 धावांचे टार्गेट 13 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर गाठत आयपीएलच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला. याउलट चेन्नईवर सलामीच्या सामन्यातच पराभवाची नामुष्की ओढवली.

रियान परागने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर राजस्थानच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजीला सुरुंग लावला. नांद्रे बर्गरने संजू सॅमसनला अवघ्या 6 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने कर्णधार ऋतुराज गायकवाडला 6 धावांवर माघारी धाडले. युवा आयुष म्हात्रेला नांद्रे बर्गरने भोपळाही फोडू दिला नाही. मॅथ्यू शॉर्टही स्वस्तात माघारी परतला. यानंतर रवींद्र जडेजाने एकाच षटकात सरफराज खानला 17 आणि शिवम दुबेला 6 धावांवर बाद करत चेन्नईची अवस्था बिकट केली. अवघ्या 57 धावांवर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने 6 विकेट्स गमावल्या होत्या. चेन्नईकडून धोनीच्या जागी पदार्पणाची संधी मिळालेल्या कार्तिक शर्माने तग धरण्याचा प्रयत्न केला. पण तोही 18 धावांवर बाद झाला. अखेरच्या टप्प्यात जेमी ओव्हर्टनने 36 चेंडूत केलेल्या 43 धावांच्या खेळीमुळे चेन्नईचे शतक फलकावर लागले. ओव्हर्टन बाद झाल्यानंतर चेन्नईचा डाव 19.4 षटकात 127 धावांवर आटोपला.
वैभवची धमाकेदार फलंदाजी
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला वैभव आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात करुन दिली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वालने मिळून पहिल्या विकेटसाठी 75 धावा जोडल्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 चेंडूत दमदार अर्धशतक झळकावले. तो 17 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या साहाय्याने 52 धावांची खेळी करून माघारी परतला. तर ध्रुव जुरेलने 18 धावा जोडल्या. यशस्वी जैस्वालने नाबाद 38 तर रियान परागने नाबाद 14 धावांची खेळी करून राजस्थानला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स 19.4 षटकांत सर्वबाद 127 (सरफराज खान 17, कार्तिक शर्मा 18, जिमी ओव्हर्टन 43, संजू सॅमसन 6, ऋतुराज गायकवाड 6, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवींद्र जडेजा प्रत्येकी 2 बळी, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवि बिश्नोई प्रत्येकी 1 बळी)
राजस्थान रॉयल्स 12.1 षटकांत 2 बाद 128 (यशस्वी जैस्वाल नाबाद 38, वैभव सूर्यवंशी 17 चेंडूत 52, ध्रुव जुरेल 18, रियान पराग नाबाद 14, अंशुल 2 बळी).
वैभवचे अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक
आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते आणि यावेळी या 15 वर्षांच्या मुलाने अवघ्या 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. तसेच, आयपीएलच्या इतिहासातील हे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. त्याने 2023 मध्ये केकेआरविरुद्ध 13 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. याशिवाय, केएल राहुल, पॅट कमिन्स आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी 14 चेंडूंमध्ये अर्धशतके झळकावली आहेत.