गुजरातसमोर राजस्थानचे लोटांगण
सलग चौथ्या विजयासह गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानी : राजस्थानचा 58 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा 58 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 217 धावांचा मोठा स्कोर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल, राजस्थान सुरुवातीच्या अपयशातून सावरू शकले नाही आणि त्यांना 58 धावांनी सामना गमवावा लागला. विशेष म्हणजे, या विजयासह गुजरातचा संघ 8 गुणासह गुणतालिकेत अव्वलस्थानावर आहे. त्यांचा हा पाच सामन्यातील चौथा विजय ठरला.
गुजरातने विजयासाठी दिलेल्या 218 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल दुसऱ्याच षटकात 6 धावा काढून बाद झाला. नितीश राणाही सपशेल अपयशी ठरला. यानंतर कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सॅमसनने 28 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 41 धावांचे योगदान दिले. परागने 14 चेंडूत 26 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो ही अपयशी ठरला. 5 धावा काढून रशीद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर हेटमायरने मात्र एकाकी झुंज देताना 32 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह सर्वाधिक 52 धावा फटकावल्या. त्याचा अडथळा प्रसिध कृष्णाने दूर केला. हेटमायर बाद झाल्यानंतर इतर राजस्थानचे फलंदाज झटपट बाद झाले. यामुळे त्यांचा डाव 19.2 षटकांत 159 धावांत आटोपला. गुजरातकडून प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर रशीद खान, साई किशोर यांनी प्रत्येकी दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.
साई सुदर्शनची अफलातून खेळी
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा स्टार फलंदाज शुभमन गिलला जोफ्रा आर्चरने फक्त 2 धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांच्यात 80 धावांची भागीदारी झाली. बटलरने 26 चेंडूत 36 धावांची खेळी केली. बटलर बाद झाल्यानंतर, शाहरुख खानने जबाबदारी घेतली आणि तुफानी खेळी खेळली आणि साई सुदर्शनसोबत 62 धावांची भागीदारी केली.
साईने यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावताना 53 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारासह 82 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. त्याला शाहरुख खानने 3 धावा करत चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात फिनिशरची भूमिका बजावणारा राहुल तेवतियाही शेवटच्या षटकांमध्ये चमकला. तेवतियाने फक्त 12 चेंडूत 24 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 2 चौकारही मारले. यामुळे गुजरातने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 217 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 बाद 217 (साई सुदर्शन 82, जोस बटलर 36, शाहरुख खान 36, राहुल तेवतिया नाबाद 24, रशीद खान 12, तुषार देशपांडे व तिक्षणा प्रत्येकी दोन बळी)
राजस्थान रॉयल्स 19.2 षटकांत सर्वबाद 159 (संजू सॅमसन 41, रियान पराग 26, हेटमायर 52, प्रसिध कृष्णा 3 बळी, रशीद खान व साई किशोर प्रत्येकी दोन बळी, मोहम्मद सिराज व अर्शद खान प्रत्येकी एक बळी).