संघर्ष करणाऱ्या ‘आरसीबी’समोर आज राजस्थानचे आव्हान
वृत्तसंस्था/ जयपूर
संघर्ष करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि जोमात असलेला राजस्थान रॉयल्स हे आज शनिवारी येथे होणार असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यामध्ये आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघांची स्थिती वेगळी असली, तरी त्यांना भेडसावणाऱ्या चिंता समान आहेत.
आरसीबीला सध्या 10 संघांच्या गुणतालिकेत आठवे स्थान मिळालेले असून त्यातून त्यांच्या समस्या दिसून येतात. परंतु राजस्थानने आतापर्यंतचे त्यांचे सर्व सामने जिंकलेले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र यातून त्यांचे प्रश्न प्रतिबिंबित होत नाहीत. अपेक्षेइतकी कामगिरी न करणारी फलंदाजीतील वरची फळी हा दोन्ही संघांना सतावणारा समान विषय आहे.
कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन आणि रजत पाटीदार यांचा समावेश असलेली आरसीबीची वरची फळी स्फोटक भासत असली, तरी त्या सर्वांना मिळून वा त्यापैकी कोणाही एकाला धडाका दाखविता आलेला नाही. याला अपवाद स्टार फलंदाज विराट कोहली असून तो सध्या ऑरेंज कॅपधारक आहे. त्याने दोन अर्धशतकांसह 203 धावा केल्या आहेत. पाटीदारने लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध 29 धावा काढलेल्या असल्या, तरी त्याने आणखी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे.
दुसऱ्या बाजूने राजस्थानच्या यशस्वी जैस्वालने तीन सामन्यांत फक्त 39 धावा केल्या आहेत आणि जोस बटलरचीही अशीच कहाणी आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये 35 धावा केल्या आहेत. रॉयल्सची फलंदाजी मुख्यत्वे कर्णधार संजू सॅमसन (109 धावा, एक अर्धशतक) आणि रियान पराग (181 धावा, 2 अर्धशतके) यांच्याभोवती फिरत आहे. या जोडीला इतरांच्या भक्कम पाठिंब्याची आवश्यकता आहे.
मात्र, गोलंदाजीजीत राजस्थानचे पारडे भारी आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि नांद्रे बर्गर तसेच अनुभवी लेगस्पिनर यजुवेंद्र चहल यांना सुरुवातीपासूनच चांगली लय मिळाली आहे आणि त्यांनी मिळून 16 बळी घेतलेले आहेत. बेंगळुरूच्या फॉर्मात नसलेल्या फलंदाजांना या त्रिकुटाचा सामना करणे कठीण जाऊ शकते. राजस्थानच्या गोलंदाजीतील सध्याच्या घडीचा एकमेव कमकुवत दुवा रविचंद्रन अश्विन असून त्याने प्रति षटक 8.3 धावा देत तीन सामन्यांमध्ये केवळ एक बळी घेतला आहे. दुसरीकडे, आरसीबीच्या गोलंदाजीत विविधता किंवा ताकद कमी असल्याचे दिसते. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल आणि ऑफस्पिनर ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी चार बळी मिळविलेले असले, तरी ते परिणामकारक ठरलेले नाहीत. तर मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ आणि त्याच्या जागी आलेला रीस टोपलेही महाग ठरलेला आहे.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरॉन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
राजस्थान रॉयल्स-संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, यजुवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.