Pandharpur News | पंढरपुरात पद्मावती जलतरण तलावात बुडून राजस्थानी तरुणाचा मृत्यू
पंढरपूर -पंढरपूर येथील नगरपालिकेच्या स्विमिंग पद्मावती टॅकमध्ये सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. युवकाचे नाव नरपत सिंग (वय २१, रा. असलाई, जि. जोधपूर, राजस्थान) असे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा युवक मित्रांसोबत पोहण्यासाठीआला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तो बुडत असताना त्याच्या सहकाऱ्याने दोर टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच तलाव व्यवस्थापन यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने युवकास पाण्याबाहेर काढले. त्याला तत्काळउपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.पंढरपूर नगरपालिकेच्या या पद्मावती जलतरण तलावात यापूर्वीही चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून हा तलाव नेहमीच वादग्रस्त असतो.