राजस्थानचा आठ गड्यांनी विजय
वृत्तसंस्था/ धर्मशाला
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे ब इलाईट गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी राजस्थानने हिमाचल प्रदेशचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात राजस्थानने पहिल्या डावात 334 धावा जमविल्यानंतर हिमाचलप्रदेशचा पहिला डाव 98 धावांत आटोपल्याने त्यांना राजस्थानने फॉलोऑन दिला. हिमाचल प्रदेशने दुसऱ्या डावात 260 धावा जमवित राजस्थानला निर्णायक विजयासाठी 25 धावांचे सोपे आव्हान दिले. राजस्थानने 2 बाद 26 धावा करत हा सामना 8 गड्यांनी जिंकला. या सामन्यात 94 धावांत 8 गडी बाद करणाऱ्या राजस्थानच्या अंकित चौधरीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक - राजस्थान प. डाव 334, हिमाचलप्रदेश प. डाव 98, दु. डाव 260, राजस्थान दु. डाव 2 बाद 26.
जुरेलचे नाबाद शतक
लखनौमध्ये सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गटातील सामन्यात उत्तर प्रदेशचा कर्णधार जुरेलने दमदार नाबाद शतक झळकाविले. तसेच रिंकू सिंगने जलद 89 धावांची खेळी केली.
हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांच्यात हा सामना सुरु आहे. या सामन्यात हरियाणाने पहिल्या डावात 453 धावा जमविल्या. हिमांनू राणाने 114 तर धीरु सिंगने 103, अंकित कुमारने 77, सुमीत कुमारने 61 आणि यजुवेंद्र चहलने 48 धावा केल्या. उत्तर प्रदेशतर्फे शिवम शर्माने 4 तर निगमने 3 आणि यश दयालने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - हरियाणा प. डाव 453, उत्तर प्रदेश प. डाव 6 बाद 267 (जुरेल खेळत आहे 118, रिंकू सिंग 89).