राजस्थान रॉयल्स-आरसीबी आज आमनेसामने
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर हे आज रविवारी येथे आयपीएलमध्ये आमनेसामने येतील तेव्हा विजयी मार्गावर परतण्यासाठी ते उत्सुक राहतील. यावेळी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविरुद्धच्या आक्रमक लढतीसाठी सलामीवीर फिल सॉल्ट आणि विराट कोहली सज्ज राहतील. दोन्ही संघ मागील सामन्यातील पराभवातून सतर्क होऊन आज मैदानात उतरणार आहेत. मागील लढतीत आरसीबी दिल्ली कॅपिटल्सकडून सहा गड्यांनी, तर राजस्थान गुजरात टायटन्सकडून 58 धावांनी पराभूत झाला.
पाच सामन्यांतून तीन विजयांसह आरसीबी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर राजस्थान तितक्याच सामन्यांतून दोन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे. पहिल्या रात्री आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा स्पेल नोंदविल्यानंतर ब्रिटिश वेगवान गोलंदाज आर्चरने परिस्थिती बदलण्यात यश मिळवले आहे. आज आर्चरवर कोहली आणि इंग्लंडचा सहकारी सॉल्ट यांचे महत्त्वपूर्ण बळी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. आर्चरचे पुनऊज्जीवन ही रॉयल्ससाठी एक उत्तम संधी आहे. कारण संदीप शर्मा वगळता त्यांच्या गोलंदाजीला प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या नियंत्रणात ठेवण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला आहे.
याचा फायदा आरसीबी फलंदाजांना घेता येईल. कोहलीने या हंगामात दोन अर्धशतके झळकावून जोरदार खेळ केला आहे. पण स्फोटक सॉल्टमुळे कोहलीला नियंत्रित आक्रमकता दाखवावी लागली आहे. देवदत्त पडिक्कल देखील मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक असेल. आरसीबी कर्णधार रजत पाटीदार चांगल्या लयीत असून टिम डेव्हिड आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपाने त्यांच्याकडे मधल्या आणि तळाकडच्या फळीत प्रभावी फिनिशर आहेत.
बेंगळूर संघाकडे जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांच्या रुपाने प्रभावी वेगवान मारा आहे, परंतु त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी थोडे अधिक सातत्य दाखविण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे, राजस्थानला गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर फलंदाजी विभागाच्या पुनऊज्जीवनाची आशा असेल. त्यांच्याकडे वरच्या फळीत संजू सॅमसन, रियान पराग, यशस्वी जैस्वाल आणि नितीश राणा अशी फायरपॉवर असून खाली ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर ही स्फोटक जोडी आहे.
संघ-रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, क्रृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फाऊकी, कुणाल सिंह राठोड, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंह चरक, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.