राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये
मुंबई इंडियन्सच्या पराभवाने पंजाब-केकेआरचे स्वप्नही भंगले : राजस्थानचा 30 धावांनी विजय : सामनावीर जोफ्रा आर्चर
वृत्तसंस्था/ मुंबई
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर, म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर 30 धावांनी पराभवाचा धक्का दिला. राजस्थानने या विजयासह 16 गुण मिळवले आणि पॉईंट्स टेबलमध्ये चौथे स्थान मिळवले. त्यामुळे आता ते सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार हे निश्चित झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला 9 गडी गमावून केवळ 175 धावाच करता आल्या.
राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर हवी तशी सुरुवात करता आली नाही. यशस्वी जैस्वाल 27 धावांवर माघारी परतला. तर वैभव सूर्यवंशी अवघ्या 4 धावांवर बाद झाला. सलामी जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर ध्रुव जुरेलने 38 धावांचे योगदान दिले. तर रियान पराग 14 धावांवर माघारी परतला. यानंतर दासून शनाकाने 29 धावांचे योगदान दिले तर डोनोवन फरेराने 18 धावा केल्या. शेवटी जोफ्रा आर्चरने 15 चेंडूत 32 धावांची बहुमूल्य खेळी केली तर रवींद्र जडेजाने 19 धावांची खेळी करून संघाची धावसंख्या 8 गडी बाद 205 धावांवर पोहोचवली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. युवा फलंदाज रिकेल्टन 12 धावा करुन तंबूत परतला. नमन धीर 6 तर तिलक वर्मा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्सने मिळून संघाचा डाव सांभाळला. सूर्यकुमार यादवने 42 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांसह सर्वाधिक 60 धावा केल्या. त्याला विल जॅक्सने 18 चेंडूत 33 धावा करत चांगली साथ दिली. याशिवाय, हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. पण, इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे मुंबईला केवळ 9 बाद 175 धावापर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने हा सामना 30 धावांनी जिंकत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
संक्षिप्त धावफलक :
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 8 बाद 205 (यशस्वी जैस्वाल 27, ध्रुव जुरेल 38, रियान पराग 14, शनाका 29, डोनोवन फरेरा 18, जोफ्रा आर्चर 32, जडेजा नाबाद 19, बर्गर नाबाद 10, दीपक चहर 2 बळी, शार्दुल ठाकुर 2 बळी, विल जॅक्स 1 बळी)
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 175 (रोहित शर्मा 0, रिकेल्टन 12, नमन धीर 6, सूर्यकुमार यादव 60, विल जॅक्स 33, हार्दिक 34, जोफ्रा आर्चर 17 धावांत 3 बळी, बर्गर, यश राज पुंजा आणि ब्रिजेश शर्मा प्रत्येकी 2 बळी).
पंजाबच्या आशा संपुष्टात
राजस्थानच्या विजयामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे स्वप्न भंगले आहे. या दोन्ही संघांच्या आशा मुंबई-राजस्थान सामन्यावर होत्या. हे दोन्ही संघ राजस्थान हरावे यासाठी आशा करत होते. पण राजस्थानने विजय मिळवल्याने या दोन्ही संघांचे आव्हान संपले. कारण हे दोन्ही संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
प्लेऑफचे वेळापत्रक
लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर आता अंतिम 4 संघ निश्चित झाले असून प्ले-ऑफचा थरार रंगणार आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांनी अव्वल 4 मध्ये जागा मिळवली आहे.
26 मे : आरसीबी वि गुजरात, क्वालिफायर-1 (धरमशाला)
27 मे : सनरायझर्स हैदराबाद वि राजस्थान रॉयल्स, एलिमिनेटर (न्यू चंदीगड)
-प्लेऑफमध्ये स्थान मिळविलेल्या प्रत्येक संघाने एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
-मुंबई इंडियन्सची पराभवाने सांगता
-नांद्रे बर्गर, यश राज पुंजा व ब्रिजेश शर्मा यांचे प्रत्येकी 2 बळी
-सोमवारी, मंगळवारी प्लेऑफ सामने होतील.
