For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयी ट्रॅकवर

06:58 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयी ट्रॅकवर
Advertisement

पंजाबवर तीन गडी राखून मात : सामनावीर हेतमेयरची 10 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुलानपूर

आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला तीन गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानला विजयासाठी 148 धावांचे आव्हान दिले आहे. हे विजयी आव्हान राजस्थानने 19.5 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अवघ्या 10 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी साकारत राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या हेतमेयरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, राजस्थानचा सहा सामन्यातील पाचवा विजय असून गुणतालिकेत 10 गुणासह अव्वलस्थानी विराजमान आहेत. पंजाबचा हा सहा सामन्यातील चौथा पराभव ठरला आहे.

Advertisement

 

पंजाबने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने सावध सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि तनुष कोटियान या दोघांनी राजस्थानला 56 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. तनुष कोटियन 24 धावांवर असताना त्याला लियाम लिव्हिंगस्टोनने त्याला बाद केलं. यानंतर यशस्वी जैस्वालला सूर गवसला असे वाटत असताना त्याला देखील कगिसो रबाडाने बाद केलं. जैस्वालने 39 धावा केल्या. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्याला 18 धावांवर रबाडाने बाद केले. यानंतर रियान पराग 23 धावा काढून तंबूत परतला. ध्रुव जुरेललाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. दरम्यान, अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 10 धावांची गरज असताना हेतमायरने शानदार खेळी साकारत राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या 10 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 3 षटकार मारले.

पंजाबची पराभवाची मालिका कायम

शनिवारच्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. राजस्थानच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर पंजाबचे फलंदाज अधिक वेळ खेळपट्टीवर न राहता ठराविक अंतराने बाद झाले. पंजाबच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. तायडे आणि बेअरस्टो या सलामीच्या जोडीने 22 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. आवेश खानने तायडेला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. त्यानंतर यजुवेंद्र चहलने प्रभसिमरनसिंगला जुरेलकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 10 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने बेअरस्टोला हेटमायरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 15 धावा केल्या. केशव महाराजने पंजाबला आणखी एक धक्का देताना कर्णधार सॅम करनला 6 धावांवर बाद केले. कुलदीप सेनने शशांक सिंगला 9 धावांवर टिपले. पंजाबची यावेळी स्थिती 12.1 षटकात 5 बाद 70 अशी होती. जितेश शर्मा आणि लिव्हिंगस्टोन यांनी सहाव्या गड्यासाठी 33 धावांची भर घातली. आवेश खानने जितेश शर्माला परागकरवी झेलबाद केले. त्याने 24 चेंडूत 29 धावा जमविल्या. लिव्हिंगस्टोन एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. आशुतोष शर्माच्या फटकेबाजीमुळे पंजाब संघाला 147 धावांपर्यंत मजल मारता आली. आशुतोष शर्माने 16 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 31 धावा जमविल्या. बोल्टने त्याला डावातील शेवटच्या चेंडूवर झेलबाद केले. ब्रार 3 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकात 8 बाद 147 (तायडे 15, बेअरस्टो 15, प्रभसिमरन सिंग 10, सॅम करन 6, जितेश शर्मा 29, शशांक सिंग 9, लिव्हिंगस्टोन 21, आशुतोष शर्मा 31, ब्रार नाबाद 3, अवांतर 8, आवेश खान 2-34, केशव महाराज 2-23, बोल्ट, कुलदीप सेन, यजुवेंद्र चहल प्रत्येकी 1 बळी).

राजस्थान रॉयल्स 19.5 षटकांत 7 बाद 152 (यशस्वी जैस्वाल 39, तनुष कोटियान 24, संजू सॅमसन 18, रियान पराग 23, हेतमेयर नाबाद 27, रबाडा व सॅम करन प्रत्येकी दोन बळी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल व लिव्हिंगस्टोन प्रत्येकी एक बळी) .

Advertisement
Tags :

.