राजस्थान-आरसीबी ‘रॉयल’ झुंज आज!
आयपीएल दुसऱया क्वॉलिफायर लढतीत उभय प्रतिस्पर्ध्यांमध्ये निकराची लढत अपेक्षित, प्रचंड मनोबल उंचावलेल्या आरसीबीसमोर राजस्थानची कसोटी लागण्याची चिन्हे
वृत्तसंस्था /अहमदाबाद
आयपीएलमधील निर्णायक जेतेपदासाठी गुजरात टायटन्सचा फायनलमधील प्रतिस्पर्धी कोण, याचा फैसला आज (शुक्रवार दि. 27) होणाऱया आयपीएलच्या दुसऱया क्वॉलिफायर लढतीत होणार असून राजस्थान रॉयल्स व आरसीबीचे संघ एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा वारु रोखण्यात यश आल्याने प्रचंड मनोबल उंचावलेल्या आरसीबीला नमवण्यासाठी राजस्थानला आज प्रामुख्याने गोलंदाजीत आमूलाग्र सुधारणा करणे भाग असेल. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
सुदैवानेच प्ले-ऑफमध्ये धडक मारल्यानंतर आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एलिमिनेटर लढतीत अचानक जोरदार मुसंडी मारली आणि या हंगामात काहीही घडू शकते, याचाच जणू दाखला दिला. आता राजस्थानविरुद्ध देखील तोच धडाका कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
कोलकात्यातील हाय-स्कोअरिंग लढतीनंतर आता आयपीएलचा उर्वरित, निर्णायक टप्पा अहमदाबादमध्ये खेळवला जाणार असून येथेही प्रेश ट्रकवर सामने होणार असल्याने धावांची आतषबाजी झाल्यास त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
बुधवारी आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारण्यात यशस्वी झालेला रजत पाटीदार आजच्या बाद फेरीच्या महत्त्वाच्या लढतीसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी अर्थातच त्याचे मनोबल उंचावलेले असेल. आयपीएल लिलावात एकाही प्रँचायझीने खरेदी न केलेल्या रजतला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची संधी मिळाली आणि याचा लाभ घेत त्याने कारकिर्दीला कलाटणी देणारी खेळी साकारली.
विराट कोहली व फॅफ डय़ू प्लेसिस हे हाय-प्रोफाईल सलामीवीर बिग मॅच प्लेयर्स आहेतच. आता राजस्थानविरुद्ध वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा इरादा असणे साहजिक असेल. दिनेश कार्तिकने फिनिशरची कठीण जबाबदारी पार पाडण्यात कमालीचे यश प्राप्त केले असून संघव्यवस्थापनाला त्याच्याबरोबरच मॅक्सवेलकडून देखील धावांची आतषबाजी अपेक्षित असेल.
आरसीबीचा संघ येथे मागील विनिंग कॉम्बिनेशन कायम ठेवण्याची दाट शक्यता असून वणिंदू हसरंगाने धुलाई झाल्यानंतरही काटेकोर मारा करण्यात हुकूमत दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये हर्षल पटेल निर्णायक मारा करण्याची क्षमता राखून आहे. मोहम्मद सिराज यापूर्वी लखनौविरुद्ध लढतीत संघात परतला आणि त्याने नव्या चेंडूवर उत्तम गोलंदाजी केली. जोश हॅझलवूडने 19 व्या षटकात सलग दोन बळी मिळवत सर्वोत्तम डेथ बॉलरचा आपला लौकिक जपला.
15 सामन्यात राजस्थानने केवळ दोनच वेळा नाणेफेक जिंकली!
यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यात राजस्थान रॉयल्सला फक्त दोनच वेळा नाणेफेक जिंकता आली आहे. एकदा गुजरात टायटन्सविरुद्ध तर एकदा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अशा दोनच सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. आजच्या बाद फेरीतील लढतीत राजस्थान रॉयल्सला नाणेफेकीतील आपली कामगिरी सुधारता येणार का, याची प्रतीक्षा असेल.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी बटलर-सॅमसनवरच अधिक अवलंबून
या हंगामात तिन्ही आघाडय़ांवर सरस प्रदर्शन साकारण्यात यशस्वी झालेल्या संघांमध्ये आघाडीवर राहिलेल्या, मात्र, उत्तरार्धात किंचीत घसरण झालेल्या राजस्थान रॉयल्सचा संघ जोस बटलर व कर्णधार संजू सॅमसनवर अधिक अवलंबून राहत आला आहे. या दोघांनी गुजरातविरुद्ध उत्तम फलंदाजी केली. पण, त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
सॅमसन 30-40 च्या घरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यांचे गोलंदाज कमबॅक करण्यात यशस्वी ठरणार का, हे देखील या सामन्यात महत्त्वाचे असणार आहे. गुजरातविरुद्ध आर. अश्विन, प्रसिद्ध कृष्णा अपयशी ठरले, ती कसर येथे भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
अहमदाबादेतील आजच्या लढतीबद्दल आम्ही विशेष महत्त्वाकांक्षी आहोत. लखनौविरुद्ध आक्रमक खेळ साकारला, त्याची येथेही पुनरावृत्ती करणे, हे आमचे पहिले लक्ष्य असेल. आणखी दोन सामने जिंकू आणि जेतेपदाचा आनंद साजरा करु, ही आमची हंगामातील साहजिक अपेक्षा!
-आरसीबीचा अव्वल फलंदाज विराट कोहली
संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, धुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, डॅरेल मिशेल, कॉर्बिन बॉश.
आरसीबी : फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.