For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थान : राजघराणी..राजकीय घराणी

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थान   राजघराणी  राजकीय घराणी
Advertisement

ब्रिटीशांच्या काळात भारतात अनेक संस्थाने होती, हे सर्वांना ज्ञात आहे. स्वातंत्र्य मिळण्याची वेळ जवळ आल्यानंतर या सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. जी संस्थाने विलीन होण्यास टाळाटाळ करत होती, त्यांच्यावर सैनिकी कारवाई करुन त्यांना भारतात सामावून घेण्यात आले. या संस्थानांवर राज्य करणाऱ्या संस्थानिकांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी नंतर राजकारणात प्रवेश केला. प्रामुख्याने त्यांनी भारतीय जनसंघ किंवा काँग्रेसची निवड केली. अशी राजघराणी राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात होती. या तीन राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये राजघराण्यांचा राजकारणावरचा प्रभाव आता बराचसा ओसरला आहे. मध्यप्रदेशमध्ये तो प्रामुख्याने शिंदे घराण्यापुरता टिकून आहे. इतरही काही राजघराण्यांचे वारसदार असणारे नेते मध्यप्रदेशात आहेत. पण ते आपल्या पूर्वेतिहासाचा फारसा संदर्भ देत नाहीत. राजस्थानात मात्र, आजही स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारणावर तेथील राजघराण्यांचा प्रभाव आहे. आजही तेथे या वारसांना ‘राजे’ किंवा ‘राण्या’ म्हणून मान मिळतो. आणि त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठविण्यास आजही मतदार राजी आहेत...

Advertisement

जनमानसावरील प्रभावाचे कारण

  • राजस्थान आणि मध्यप्रदेशातील राजघराणी प्रारंभापासून सर्वसामान्य जनतेच्या आदराची स्थाने राहिली आहेत. त्यांनी जनतेसाठी बऱ्याच सोयी पूर्वीपासून करुन दिल्या. ब्रिटीशांच्या काळात या राजघराण्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात सत्ता होती. तिचा उपयोग अनेक संस्थानिकांनी जनतेच्या भल्यासाठी केला होता. बरीच राजघराणी केवळ जनतेच्या शोषणात धन्यता मानत नव्हती. या घराण्यांच्या वारसांचा आजही प्रभाव टिकून राहण्यामागे हे प्रभावी कारण आहे.
  • जनतेची मानसिकताही याला कारणीभूत आहे. ‘राजा’ म्हणजे भूलोकी अवतरलेला देवच, ही भावना सर्वसामान्यांमध्ये पूर्वीपासून आहे. आज ती त्या प्रमाणात राहिलेली नसली, तरी तो आदर पुष्कळ प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे राजघराण्यातील व्यक्तीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. राजघराण्यातील व्यक्तींना लोकसभा किंवा विधानसभा या प्रतिनिधीगृहांमध्ये निवडून देणे, जनतेलाही प्रतिष्ठेचे वाटते. त्यामुळे लोकशाहीतही त्या प्रभावी आहेत.
  • देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्वरित राजघराण्यांमधील लोकांनी राजकीय पक्षांमध्ये जाऊन सत्ता मिळविण्याचे नवे मार्ग शोधले. साहजिकच जनतेच्या संपर्कात राहण्याची संधी त्यांना मिळाली. राजकीय पक्षांनाही त्यांच्या लोकप्रियतेची आवश्यकता होतीच. त्यामुळे त्यांनी राजघराण्यांच्या वारसांना सामावून घेतले. अशा प्रकारे दोघांच्याही आवश्यकता एकमेकांच्या सहकार्याने पूर्ण झाल्या.

यंदाच्या निवडणुकीतही मोठे स्थान : भारतीय जनता पक्ष

Advertisement

  • यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजघराण्यांच्या वारसांना भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या पक्षांनी अनेक मतदारसंघांमधून उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक मेवाड राजवंशाच्या तरुण वारसदार महिमा सिंग यांना राजस्थानमधील राजसमंद मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती विश्वराजसिंग हे गेल्या डिसेंबरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे आमदार म्हणून नाथद्वारा मतदारसंघातून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, या दांपत्याची प्रथमच निवडणूक आहे. या घराण्याचा रजपूत समाजावर प्रभाव आहे.
  • झलवार-बारन लोकसभा मतदारसंघात सिंदिया घराण्याच्या वारसदार वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंतसिंग यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी पाचव्या वेळेला देण्यात आली आहे. वसुंधराराजे याच मतदारसंघातून निवडून येत असत. दुष्यंतसिंग हे गेली 20 वर्षे राजकारणात खासदार म्हणून सक्रीय आहेत. ते मत मागताना आपली कामगिरी आणि राजघराणे अशा दोन्ही मुद्द्यांचा उपयोग करतात. या घराण्यासंबंधी लोकांना आदर वाटतो. त्यामुळे त्यांना यश मिळते.

राजकीय घराण्यांचाही चलती

  • राजघराण्यांसमवेत राजकीय घराण्यांचीही राजस्थानात चलती आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या घराण्यांवर मोठ्या प्रमाणात विसंबून राहण्याचा निर्णय घेतलेला दिसून येतो. जयपूर मतदारसंघात या पक्षाने ज्येष्ठ नेते भंवरलाल शर्मा यांची कन्या मंजू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. गेल्यावेळी या मतदारसंघातून याच पक्षाचे रामचरण भोरा निवडून आले होते. आता मंजू शर्मा यांना मैदानात आणण्यात आले आहे. तर काँग्रेसने दुष्यंतसिंग या राजघराण्यातील उमेदवारासमोर आपल्या राजकीय घराण्यातील उर्मिला जैन भाया यांना उतरविले आहे. त्या काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या भाया घराण्यातील आहेत.

मिर्धा राजकीय घराणे

  • राजस्थानात जाट समुदाय राजकारणात महत्वाची भूमिका निभावतो. हे लक्षात घेऊन दोन्ही पक्ष येथे जाट उमेदवारांना प्राधान्य देतात. या जातीतील महत्वाचे नाव म्हणजे नाथूराम मिर्झा. नागौर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने त्यांची नात ज्योती मिर्धा यांना उमेदवारी दिली आहे. मिर्धा घराण्याची या राज्यात विशेष वट आहे. त्यामुळे हे राजकीय घराणे आणि जाट समुदाय या दोघांनाही प्राधान्य या पक्षाकडून देण्यात आले आहे. नाथूराम मिर्धा हे खरेतर काँग्रेस नेते. पण ज्योती मिर्धा यांचा पराभव 2014 आणि 2019 मध्ये झाला होता. आता त्या भारतीय जनता पक्षाकडून याच मतदारसंघातून आपले भवितव्य आजमावीत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने मातब्बर उमेदवार दिला आहे. यामुळे ज्योती मिर्धा यांच्यासमोर विजय मिळविण्याचे आव्हान असणार अहे.
  • काँग्रेसनेही झुनझुनू मतदारसंघात जाट असलेले आमदार ब्रिजेंद्रसिंग ओला यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. ते प्रसिद्ध राजकीय नेते शीशराम ओला यांचे पुत्र आहेत. ओला घराणे काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. अशा प्रकारे आजही राजस्थानात राजघराणी आणि राजकीय घराणी यांचे दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये वर्चस्व पहावयास मिळते.

प्रथम टप्प्यातील महत्वाचे मतदारसंघ

भरतपूर (मतदारसंख्या 12 लाख 46 हजार)

  • निमशहरी असणाऱ्या या राजस्थानातील मतदारसंघावर 1999 पासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. येथे मागावर्गीय समाजाच्या मतदारांची बहुसंख्या आहे. त्यांच्यासह जाट आणि रजपूत मतदारही मोठ्या संख्येने आहेत. 1999 च्या पूर्वी या मतदारसंघात अपक्ष आणि काँग्रेस यांच्यात चुरस पहावयास मिळत होती.
  • 1952 च्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसला अपक्षाकडून दणका बसला होता. गजराज सिंग या राजघराण्यातील व्यक्तीचा विजय झाला होता. त्यानंतर आलटून पालटून काँग्रेस आणि अपक्ष यांचे वर्चस्व राहिले. गेल्या पाच निवडणुकांपैकी चारमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष जिंकला आहे. भारतीय जनता पक्षाने राजकुमार कोली तर काँग्रेसने संजना जातव यांना उमेदवारी दिली आहे.

करौली-धोलपूर

  • हा मतदारसंघ मध्यप्रदेशच्या सीमेला लागून आहे. तो परिसीमनानंतर अस्तित्वात आला. त्यापूर्वी त्याचा मोठा भाग बयाणा मतदारसंघात होता. तर काही भाग सवाई माधोपूर मतदारसंघात होता. दलित आणि मागासवर्गीयांची बहुसंख्या येथे आहे. भारतीय जनता पक्षाने इंदुदेवी जातव यांना तर काँग्रेसने भजनलाल जातव यांना 2024 च्या लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
  • 2009 मध्ये येथे पहिली लोकसभा निवडणूक झाली. ती काँग्रेसने जिंकली. मात्र, 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाने मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्या आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाने मनोज राजोरिया यांना उमेदवारी न देता त्यांच्या स्थानी जातव यांना आणले आहे.

दौसा मतदारसंघ (मतदारसंख्या 11 लाख 28 हजार)

  • या भागावर काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे वर्चस्व होते. त्यांचे पुत्र सचिन पायलट आज वारसा चालवत असले तरी त्यांना काँग्रेस पक्षाने म्हणावे तसे महत्व दिलेले नाही. ते नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये येथे भारतीय जनता पक्षाने मोठे विजय मिळविले आहेत.  भारतीय जनता पक्षाने कन्हय्यालाल मीना तर काँग्रेसने मुरारीलाल मीना यांना उतरविले आहे.
  • 1957 पासून येथे लोकसभा निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पक्षाने केवळ तीनदा विजय मिळविला आहे. अस्तंगत झालेल्या स्वतंत्र पक्षानेही विजयाची चव चाखली आहे. पण पूर्वेतिहास पाहता काँग्रेसला अधिक यश आहे. मागासवर्गीय मतदारांची येथे बहुसंख्या असून दलित मतदारही लक्षणीय संख्येने आहेत.

अलवर मतदारसंघ (मतदारसंख्या 13 लाख 53 हजार)

  • राजस्थानच्या पहिल्या काही मतदारसंघांपैकी हा एक आहे. 1977 आणि 1991 चा अपवाद वगळता येथे 1998 पर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व होते. गेल्या दोन निवडणुका मात्र भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाने उमेदवार परिवर्तन केले असून माजी खासदार महंत बालकनाथ यांच्या स्थानी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात यादव मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत सहा वेळा या समाजातील उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवारही यशस्वी झाला आहे.
  • एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ आता भारतीय जनता पक्षाचा गड म्हणून ओळखला जातो. भूपेंद्र यादव यांना येथे विजयाची अपेक्षा आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात ललित यादव यांना उमेदवारी दिली आहे. ब्राम्हण मतेही या मतदारसंघात लक्षणीय प्रमाणात आहेत.
Advertisement
Tags :

.