राजस्थानसमोर आज अजिंक्य पंजाब किंग्सचे आव्हान
राजस्थान रॉयल्सला मुसंडी मारण्यासाठी करून दाखवावी लागेल विशेष कामगिरी
वृत्तसंस्था
मुल्लानपूर : धावा करण्यात अपयशी ठरलेल्या कर्णधार रियान परागला आज मंगळवारी मुल्लानपूर येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात अजोड पंजाब किंग्सला आव्हान देताना संघाचे नेतृत्व चांगल्यारीत्या तर करावे लागलेच, शिवाय फलंदाजीत स्वत: जबाबदारी घ्यावी लागेल. गेल्या वर्षी सुरू झालेल्या श्रेयस अय्यर-रिकी पाँटिंग युगात पंजाब किंग्सने एक सनसनाटी पुनरागमन केले आहे. यामुळे तो या स्पर्धेतील सर्वांत सातत्यपूर्ण आणि भरवशाचा संघ बनला आहे. या स्थानावर पोहोचण्याची त्यांना अनेक वर्षांपासून आस लागली होती.
विराट कोहलीने गेल्या काही वर्षांत आपल्या उल्लेखनीय सातत्याच्या जोरावर ‘चेज-मास्टर’ हा किताब मिळवला आहे आणि आता अय्यरही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतही वाखाणण्याजोगा संयम दाखवला आहे, ज्यामुळे पंजाब किंग्सला या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहणे शक्य झाले आहे.
अय्यरने अत्यंत उत्कृष्ट नेतृत्व केलेच आहे, परंतु संपूर्ण संघानेही एका सुसूत्रित यंत्रणेप्रमाणे काम केले आहे. गेल्या हंगामात त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत कमी धावसंख्येचे यशस्वीपणे रक्षण केले होते आणि यावेळी नवी दिल्लीतील एका कडक उन्हाच्या शनिवारी अय्यर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 265 धावांचे विक्रमी लक्ष्य अत्यंत सहजतेने गाठले. सात सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय (एक सामना पावसामुळे रद्द) हे प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या विध्वंसक सलामीच्या जोडीमुळेही शक्य झाले आहे. या जोडीने कोटला मैदानावर पॉवरप्लेमध्ये 116 धावा फटकावून आपल्या संघाला एका ऐतिहासिक लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या मार्गावर नेले.
त्या सामन्यात पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली होती, परंतु फलंदाजीस अनुकूल खेळपट्टी आणि मैदानाचे लहान आकारमान पाहता त्यांना फारसा दोष देता येणार नाही. या हंगामातील शेवटचे तीन लीग सामने धरमशाला येथे खेळण्यापूर्वी या मैदानावर आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या पंजाब किंग्सकडून राजस्थान रॉयल्सचा सहज पराभव केला जाण्याची अपेक्षा केली जात आहे. स्पर्धेचे सुऊवातीचे चार सामने जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात आपली गती गमावली आहे. जरी किशोरवयीन सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशीने तोंडात बोटे घालावीत अशी कामगिरी केली असली, तरी संघाला मात्र आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. या हंगामातील आठ सामने होऊन गेल्यानंतरही कर्णधार पराग मधल्या फळीत आपली कामगिरी बजावण्यात अपयशी ठरला आहे. तसेच संघाचे क्षेत्ररक्षणही अत्यंत सुमार दर्जाची राहिले आहे.
संघ-पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, अजमतुल्ला ओमरझाई, झेवियर बार्टलेट, नेहल वढेरा, यश ठाकूर, विष्णू विनोद, प्रियांश आर्य, विजयकुमार वैशाख, मुशीर खान, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, हरनूर सिंग, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, कूपर कोनोली, मिशेल ओवेन, विशाल निषाद
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, संदीप शर्मा, वैभव सूर्यवंशी, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, डोनोवन फरेरा, क्वेना माफाका, शुभम दुबे, अॅडम मिलने, कुलदीप सेन, दासुन शनाका, युधवीर सिंग चरक, सुशांत मिश्रा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, ब्रिजेश शर्मा, अमन राव, विघ्नेश पुथूर, यशराज पुंजा, रवी सिंग.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.