राजस्थानात काँग्रेसला खिंडार; आदिवासी नेते महेंद्रजीतसिंग मालवीय भाजपमध्ये
वृत्तसंस्था / जयपूर
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसला आता राजस्थानातही खिंडार पडले आहे. प्रभावी आदिवासी नेते आणि विद्यमान आमदार महेंद्रजीतसिंग मालवीय यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी पक्ष सोडू नये. म्हणून काँग्रेसने बरेच प्रयत्न केले होते. तथापि, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक धोरणाला पाठिंबा देण्यासाठी आपण या पक्षात आलो आहोत. तसेच काँग्रेसने भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले, हे धोरणही आपल्याला व्यथित करणारे होते, असेही प्रतिपादन मालवीय यांनी केले आहे.
मालवीय हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते. या पक्षाचे ते चारवेळा आमदार होते. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी बागीदोरा मतदारसंघातून विजय मिळविला होता. राजस्थानातील बन्सवारा आणि डुंगरपूर जिल्ह्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. हा आदिवासी बहुल भाग आहे. ते एकदा याच भागातून खासदार म्हणूनही लोकसभेत निवडून आले आहेत. राजस्थान मंत्रिमंडळात ते गेली पाच वर्षे मंत्री होते.
काँग्रेसची आगपाखड
काँग्रेसने मालवीय यांच्या पक्षांतरावर आगपाखड केली आहे. पक्षाने त्यांना सर्व काही दिले. त्यांची काँग्रेसच्या कार्यकारिणीतही वर्णी लावली. मात्र, त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली. मात्र, त्यांच्या पक्षांतराचा कोणताही परिणाम काँग्रेसवर होणार नाही. काँग्रेसला त्यांच्यापासून कोणतीही हानी होणार नाही, अशी टीका काँग्रेसने केली.
मालवीय यांचा प्रतिवार
काँग्रेसने आपल्याला जितके दिले, त्यापेक्षा अधिक मी काँग्रेससाठी केले आहे. काँग्रेसने भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्यामुळे मी अतिशय दु:खी झालो आहे. काँग्रेसची धोरणे अलिकडच्या काळात चुकीच्या दिशेने जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या महामार्गावर देश वेगाने पुढे चालविला असून मी पूर्ण निष्ठेने त्यांना साहाय्य करणार आहे. आदिवासींचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन मालवीय यांनी केले आहे.