राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला सोमवार पासून
महापालिकेच्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजन
उपायुक्त साधना पाटील यांची माहिती
कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भास्करराव जाधव वाचनालयाच्या वतीने दरवर्षी राजर्षि शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा ही व्याख्यानमाला 16 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे. सायंकाळी 6.00 वाजता खासबाग येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब येथे ही व्याख्यानमाला होणार आहे, अशी माहिती उपायुक्त साधना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर महानगरपालिकेचे .भास्करराव जाधव वाचनालय दरवर्षी सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम म्हणून राजर्षि शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करते. वाचनालयाच्या स्थापनेपासून समाज प्रबोधनासाठी वेळोवेळी अनेक तज्ञ लोकांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. मात्र सन 1985 पासून प्रत्येक वर्षी महानगरपालिकेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील थोर व नामवंत वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित केली जातात. यंदाही अशाच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला यावेळी सहाय्यक आयुक्त नेहा आकोडे, उज्वला शिंदे यांच्यासह कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
वाचनालयाचा इतिहास
करवीर क्षेत्रातील सर्वात जुन्या सार्वजनिक वाचनालयापैकी एक वाचनालय म्हणजे भास्करराव जाधव वाचनालय होय. अनेक वर्षापासून करवीरवासीयांसाठी एक सांस्कृतीक केंद्र म्हणून उदयास आलेले हे वाचनालय. सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचा वारसा जतन करणाऱ्या या संस्थेचा इतिहासही तितकाच जूना आहे. सन 1941 ते 1949 या स्वातंत्र्यपूर्व काळात करवीर नगर परिषदेने भास्करराव जाधव वाचनालय, छत्रपती महाराणी ताराबाई वाचनालय व पद्माराजे वाचनालय अशी तीन वाचनालये सुरू केली होती. करवीर संस्थानाचे विलीनीकरणानंतर सन 1952 मध्ये तत्कालीन नगरपरिषदेने इतर दोन वाचनालये भास्करराव जाधव वाचनालयामध्ये समाविष्ट करून सुसज्ज असे वाचनालय सुरू केले. भास्करराव जाधव हे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. त्यांनी कोल्हापूर शहरासाठी जे योगदान दिले त्याचे स्मरण म्हणून या वाचनालयाला ‘श्री भास्करराव जाधव वाचनालय‘ असे नामकरण करणेत आले आहे.
व्याख्याने आणि वक्ते
1 16 डिसेंबर केशव जाधव महाभारत काल
अपर सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई आज आणि उद्या
2 17 डिसेंबर प्रविण दवणे (ठाणे)
ज्येष्ठ साहित्यीक दीपस्तंभ मनातले, जनातले
3 18 डिसेंबर उर्मिला शुभंकर (कोल्हापूर) चला तणावमुक्त जगुया
समुपदेशक शिवाजी विद्यापीठ
4 19 डिसेंबर संजय आवटे (पुणे) चला उभारु नवी पिढी
5 20 डिसेंबर तृप्ती धोडमिसे (आय.ए.एस) स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन
मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली आणि संवाद