For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shahu Jayanti Special पहिले महायुद्ध अन् किर्लोस्करांचं उत्पादन बंद...ऱाजर्षी शाहू महाराजांच्या सहकार्याने बनले तोफांचे नांगर

03:07 PM Jun 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
shahu jayanti special पहिले महायुद्ध अन् किर्लोस्करांचं उत्पादन बंद   ऱाजर्षी शाहू महाराजांच्या सहकार्याने बनले तोफांचे नांगर
Advertisement

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती. २६ जून १८७४ साली कागलच्या घाटगे घराण्यात महाराज जयसिंगराव घाटगे आणि माता राधाबाई यांच्या पोटी जन्माला आले. जन्मत:च प्रचंड बुद्धिमत्ता, कमालीची बलाढ्य शरीरयष्टी आणि व्यवहारचातुर्यासोबत लाभलेली जिज्ञासा महाराजांची गुणवैशिष्टे होती. १८९४ साली जेव्हा महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला त्या दिवसापासून महाराजांनी रयतेच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. आज महाराजांच्या जयंती दिनी त्यांच्या आयुष्यातील एका विशेष आठवणीला उजाळा देऊया. 

Advertisement

ही गोष्ट आहे तोफांच्या नांगरांची. हा शब्द वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल. तोफा आणि नांगर हे दोन परस्परविरोधी शब्द. एकाचा संबंध युद्धाशी तर दुसऱ्याचा शेतकऱ्यांशी आणि त्याच्या काळ्या आईशी. पण करवीर नरेश राजर्षी शाहू महाराजांनी या दोन शब्दांना एकत्र करण्याची किमया साधली. त्याचीच ही गोष्ट

किर्लोस्करांची मोठी अडचण आणि महाराज उभे ठाकले

Advertisement

पहिल्या महायुद्धाची धामधून जगभरात सुरू होती. युद्धाच्या ज्वाळांनी जगभरातल्या व्यापार - व्यवसायावर मोठा परिणाम केला होता. युद्ध सुरु होऊन दोन वर्षे उलटली तरी ते थांबायची चिन्हे दिसेनात. अशा काळात अनेक उद्योजक निराशेच्या गर्तेत सापडले होते. याचा सर्वात मोठा परिणाम झाला तो कृषी आणि कारखानदारीवर. भारतावर ब्रिटीशांचे राज्य असल्याने आणि ब्रिटीश युद्धात गुंतल्याने सगळी आयात थांबली. कारखानदारी आता संपते की काय असा प्रश्न निर्माण झाला. 

अशा काळात महाराष्ट्रातले एक उद्योजक किर्लोस्करही निराश झाले. त्याचं झालं असं की किर्लोस्करांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथे लोखंडी नांगरांचा कारखाना सुरु केला होता. लाकडी नांगर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना किर्लोस्कर बंधूंच्या या प्रयोगाचा चांगलाच फायदा झाला. नांगरणीचे काम सोपे झाले आणि नांगराची झीजही. पहिल्या महायुद्धाची झळ किर्लोस्करांच्या कारखान्यालाही बसायला लागली. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे १९१६ साली आयात पूर्णत: बंद झाली. आणि कारखान्यातील कामगारांसमोर बेकारीचा प्रश्न आ वासून उभा राहिला. शेतीप्रधान देशात नांगराविना काम कसे करणार? शेती अडचणीत आली. परिणामी बेकारी आणि उपासमारी या दोन अभद्र बहिणी हातात हात घालून समोर आल्या.

किर्लोस्कर खचून गेले. पण ते नव्याने उभे राहिले. त्या काळात नांगरासाठी लागणारी पट्टी जर्मनीहून यायची. लोखंड तर यायचे बंदच झाले होते. या अडचणीच्या काळात लक्ष्मणराव किर्लोस्करांमधला कल्पक उद्योजक जागा झाला आणि त्यांनी पुण्याचे प्रसिद्ध व्यापारी राजभाई आदमजी यांच्याकडून बीड धातूचे स्क्रॅप मागवले.

किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर

नांगरासाठी लागणारे रंगही मिळेनासे झाले होते त्याची निकड भागवण्यासाठी लक्ष्मणरावांनी उत्तरेतून काव मागवली आणि जवसाच्या तेलात मिसळून रंग तयार केला. पण म्हणतात ना संकटे इतक्यात हार मानत नाहीत. ही नवी कल्पना अपुरी पडली. स्क्रॅपचा पुरवठा बंद पडला आणि शेतकऱ्यांसमोरचाा प्रश्न अधिक बिकट झाला.

अशा वेळी लक्ष्मणराव किर्लोस्करांना एक नवी कल्पना सुचली आणि या कल्पनेने इतिहासाच्या विशाल पटलावर एका अद्भुत गोष्टीला जन्म दिला. कोल्हापूर संस्थानातील किल्यांवर काही तोफा गंजत पडलेल्या आहेत याची लक्ष्मणरावांना आठवण झाली. ही गोष्ट लक्ष्मणरावांचे पुतणे म्हणजेच शंकरराव किर्लोस्करांना समजली त्यांनी कोल्हापूर टेक्निकल स्कूलचे एस व्ही काटे यांच्याशी संपर्क साधला आणि करवीर नरेश राजर्षी शाहू महाराजांशी भेट घालून देण्याची विनंती केली.

लक्ष्मणराव किर्लोस्करांचे पुतणे शंकरराव किर्लोस्कर

शाहू महाराजांशी भेट आणि शंकरराव गहिवरले

शाहू महाराजांसोबत सावलीप्रमाणे राहणारे महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराजांना किर्लोस्कर मंडळींची अडचण समजली. त्यांनी सर्वांना राजवाड्यावर बोलावले आणि महाराजांना म्हणाले " महाराज किर्लोस्करांची माणसं आलीयत"

काय काम काढलं ? महाराजांनी आपुलकीनं विचारलं, महाराज त्यांना आपल्या किल्ल्यावरच्या तोफा हव्यायत" बापूसाहेब महाराजांनी थेट सांगितलं. तोफा त्या आणि कशासाठी? महारांजांचा पुन्हा प्रश्न आला. 

बापूसाहेब म्हणाले महाराज युद्धामुळे लोखंड मिळत न्हाई नांगर बनवण्यासाठी तोफा लागतील. गोरगरीब शेतकऱ्यांना आईच्या मायेने बघणारे शाहू महाराज पटकन म्हणाले "अस्स होय शेतकऱ्यांच्या उपयोगी जर त्या तोफा पडणार असतील  तर त्यांना द्या, किर्लोस्कर शहाणा माणूस आहे." हे उद्गार ऐकून शंकरराव किर्लोस्करांच्या डोळ्यातून अश्रू आले.

शंकरराव महाराजांना धन्यवाद देऊन बाहेर पडले आणि म्हणाले "राजा म्हणून राजेपणाचे जीवन न जगता या राजाने आपले राजेपण केवळ रयतेच्या हितकल्याण सुखासाठीच वेचल्याने राजाला रयतेच्या अडचणी समजल्या व त्या उदार अंत:करणाने सोडवल्या अशा या राजाने तोफांच्या बदल्यात माझ्याकडून एक दमडीदेखील घेतली नाही या राजाला माझा हजारो वेळा मुजरा" असं पुटपुटत समाधानी अंत:करणाने शंकरराव किर्लोस्करवाडीला परतले.

ही आठवण स्वत: शंकरराव किर्लोस्करांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. रयतेसाठी आपलं आयुष्य खर्च करणाऱ्या करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना तरुण भारतकडून विनम्र अभिवादन...

Advertisement
Tags :

.