कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News: आवाज सोडतो, काचा फोडतो, मिरवणुकीत नाचवले फलक

01:09 PM Aug 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लेसर किरणाच्या झोताने गल्लीबोळ आणि मुख्य रस्तेही अक्षरश: उजळून निघाले

Advertisement

कोल्हापूर : गणेशोत्सव मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा दणका आणि लेसर किरणाचे झोत अजिबात चालू देणार नाही, हा पोलिसांचा इशारा बुधवारी राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत बहुतेक तरुण मंडळांनी गुंडाळून ठेवला आणि सारी राजारामपुरी हादरवून टाकणारा साऊंड सिस्टीमचा दणका सलग पाच तास सुरू राहिला.

Advertisement

लेसर किरणाच्या झोताने गल्लीबोळ आणि मुख्य रस्तेही अक्षरश: उजळून निघाले. त्यातही विशेष असे की ‘आवाज सोडतो...काचा पडतो..’ असे फलक नाचवत तरुणांनी द्यायचा तो इशारा प्रशासनाला दिला. आजची राजारामपुरी येथील ही आगमन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दीचा अक्षरश: लोट उसळला.

फक्त राजारामपुरीतीलच नव्हे तर कोल्हापूरच्या इतर पेठांतील तरुणही या मिरवणुकीत सहभागी झाले. रात्री आवाज जरूर बंद झाला. पण त्यापूर्वीच्या चार-पाच तासांत तरुण मंडळांनी जो घ्यायचा तो आनंद पुरेपूर घेतला. राजारामपुरीतली ही आगमन मिरवणूक म्हणजे कोल्हापुरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत काय काय असणार, याचा ट्रेलरच गणेशोत्सव मंडळांनी बुधवारी दाखवला.

राजारामपुरी परिसरातील तरुण मंडळे विसर्जन मिरवणूक काढत नाहीत, पण गणेश आगमनाची मिरवणूक दणक्यात काढतात. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून ही प्रथा राजारामपुरीत सुरू आहे. त्यामुळे आपली जी काय ताकद आहे, ती या मिरवणुकीत तरुण मंडळी दाखवून देतात.

राजारामपुरीतील या तरुण मंडळांना मदतीचे अनेक हात पुढे येतात. आता तर महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आहे. त्यामुळे या मिरवणुकीला अनेकांनी बळ दिले. राजारामपुरीचा गणेशोत्सव म्हणजे 20- 25 वर्षांपूर्वी खूप चांगला होता. कोल्हापुरात म्युझिक लाईट प्रकार राजारामपुरीने प्रथम आणला.

प्रत्येक गल्लीत दोन दोन मंडळे वेगवेगळ्या विषयावरचे देखावे उभे करत होते आणि सारे कोल्हापूरकर राजारामपुरीतील हे देखावे पाहण्यासाठी येत होते. रस्ते गर्दीने फुलून जात होते. आजही राजारामपुरीत गर्दी होती. पण तिथल्या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले होते.

तरुणांची मानसिकता पाहता लखलखाटावर त्यांचा भर नक्कीच राहिला. अशा वातावरणात हजारो तरुण मिरवणुकीत नाचणार, हे देखील स्पष्ट होते. पण पोलिसांनी ‘जे करू नका,“ असे वारंवार इशारा देत सांगितले होते, तेच या मिरवणुकीत बहुतेक मंडळांनी केले आणि आगमन मिरवणूक पूर्ण तयारीनिशी काढली. .

पोलिसांनी ही मिरवणूक सुरू झाल्यानंतर आपण काही कारवाई केली आणि कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला तर काय, अशा विचाराने बुधवारी बहुतेक कारवाई केली नाही आणि त्यामुळे या मिरवणुकीचा रंग वाढतच गेला. मिरवणुकीतील मंडळांना पक्षांकडून नारळ-शाल देण्यात येत होती. निवडणुकीतील काही इच्छुकांनी आपली तयारीही या निमित्ताने दाखवली. त्यामुळे बहुतेक मंडळांनी दणदणाट कायम ठेवला आणि तरुणांनी बेधुंद नाचण्याचा पुरेपूर आनंद घेतला.

राजारामपुरीत मिरवणुका, सलग 5 तास दणदणाट

आवाज सोडतो.. काचा फोडतो.. हे फलक या मिरवणुकीत बिनधास्त नाचवले गेले. मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा अतिशय तीक्ष्ण अशा ताकदीची वापरण्यात आली. त्यामुळे फक्त आणि फक्त दणदणाटच राजारामपुरीत होत राहिला. एकमेकांशी बोलताही येत नव्हते, असा हा दणदणाट 4 ते 5 तास सलग सुरू राहिला.

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#dj#ganeshotsav2025#Police action#rajarampuri#shahupuri#sound system#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaShivaji Peth
Next Article