Cultural Kolhapur: कोल्हापूरची जडणघडण आणि राजाराम महाराजांचे योगदान
कोल्हापूर संस्थांनचा राजा म्हणून राजाराम महाराजांच्याकडे कोल्हापूरचा कारभार आला
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : राजाराम महाराज हे छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव. त्यांचा जन्म 31 जुलै 1897 चा. शाहू महाराजांच्या कार्याचा वारसा त्यांच्या पाठीशी. एवढेच नव्हे तर शाहू महाराजांची अपुरी कामे पूर्ण करुन घेण्याचे सारे श्रेय राजाराम महाराजांचे. 6 मे 1922 रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. आणि कोल्हापूर संस्थांनचा राजा म्हणून राजाराम महाराजांच्याकडे कोल्हापूरचा कारभार आला.
कोल्हापूरसाठी भरभरून कार्य करणाऱ्या राजाराम महाराजांची गुरुवारी जयंती झाली. त्यांच्या कार्याचा हा आढावा. कोल्हापूरमधील मोठी व्यापार पेठ असलेल्या शाहूपुरीची सुरुवात होते छत्रपती राजाराम चौकातून. पण कोल्हापूरकरांनाही राजाराम चौक कोठे? असे विचारले तर अजूनही कळत नाही. व्हीनस कॉर्नर म्हटले की मात्र लगेच कळते.
छत्रपती राजाराम महाराजांची खरी ओळखच अनेकांना नाही, हेच यातून जाणवते. राजर्षी शाहू महाराजांना तीन मुले. आक्कासाहेब महाराज, राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी अशी त्यांची नावे. राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी यांना शिक्षणासाठी विलायतेला पाठवण्यात आले होते. पण पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यांना परत कोल्हापुरात आणण्यात आले.
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची नात व फत्तेसिंहराव यांची कन्या इंदुमती राणीसाहेब यांच्याशी त्यांचा बडोदा येथे विवाह झाला. हत्तीच्या रथातून या दाम्पत्याची कोल्हापुरातून शाही थाटात वरात निघाली.
शैक्षणिक संस्था स्थापनेचा धडाका
यापुढे तर राजाराम महाराजांच्या कार्याचा धडाका सुरू झाला. त्यांनी कोल्हापुरात लॉ कॉलेज सुरू केले. बी. टी. कॉलेज म्हणजे शिक्षक प्रशिक्षित करण्याचे महाविद्यालय सुरू केले. यासाठी त्यांनी शाहूपुरीत मोठी वास्तू बांधली. आता तेथे तात्पुरत्या स्वरूपात करवीर पंचायत समिती आहे. तिथल्या कॉ लेजला दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतला.
आर्थिक, कृषी उन्नतीसाठीही प्रयोग
1932 मध्ये राजाराम महाराजांनी बँक ऑफ कोल्हापूरची स्थापना केली. राजाराम टॉकीजच्या मागे आता जिथे ट्रेझरी ऑ फिस आहे तेथे ही बँक होती. कोल्हापुरात शेतीवर भर देणारे लोक अधिक होते. त्यातही प्रत्येकाच्या शेतात ऊसच. त्यामुळे राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कसबा बावड्यात शुगर मिलची उभारणी झाली. त्यातील भाग भांडवलाचा मोठा वाटा राजाराम महाराजांनीच उचलला.
आयटीआयआधीच तंत्रशाळेची स्थापना
शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर कोल्हापूर संस्थांनचा कारभार शाहू महाराजांच्या कडे आला. त्यांनी काही दिवसातच आपल्या कामाची झलक दाखवण्यास सुरुवात केली. शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिक्षणाचा पाया घातला. राजाराम महाराजांनी तो पाया अधिक भक्कम केला.
राजाराम महाविद्यालयात विज्ञान विभाग सुरू केला. बीएससी होण्याची शैक्षणिक सोय कोल्हापुरात सुरू झाली. आता पद्मा चौकात शाहू टॉकीजसमोर जी अतिशय देखणी अशी दगडी इमारत आहे ती राजाराम कॉलेजच्या विज्ञान शाखेची.
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हेतर व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी त्यांनीच ओबरायन टेक्निकल स्कूलची सुरुवात केली. आता मटन मार्केटला लागून जो हत्ती महाल म्हणून जी वास्तू आहे म्हणजेच जिथे शिक्षण उपसंचालकांचे कार्यालय आहे तेथे हे टेक्निकल स्कूल सुरू झाले. आयटीआय सुरू होण्यापूर्वी संस्थांच्या राजवटीत ही तंत्रशाळा त्यांच्याच प्रयत्नातून कोल्हापुरात सुरू झाली.
विमानतळाचीही उभारणी
हे काम कमी म्हणून की काय म्हणून राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत उजळाईवाडी विमानतळाची उभारणी झाली व त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत पहिल्या विमानाने मुंबईच्या दिशेने झेप घेतली. आता कोल्हापूर विमानतळ रात्रीच्या उड्डानासाठीही सज्ज आहे. त्याचे आधुनिकीकरण झाले आहे. पण या विमानतळाच्या पायाचा दगड राजाराम महाराजांनीच बसवला आहे.
‘राधानगरी’च्या पूर्णत्वातही मोलाचा हातभार
त्याहून महत्त्वाचे म्हणजे राधानगरी धरणाचे रखडलेले बांधकाम राजाराम महाराजांच्या काळातच पूर्ण झाले. शाहू महाराजांनी या धरणाचा पाया घातला ‘पण आर्थिक अडचणीमुळे काम संथगतीने होत गेले .पण या धरणाची गरज लक्षात घेऊन राजाराम महाराजांनी हे काम पूर्ण केले व कोल्हापूरच्या शेतीला त्यांनी कायम हिरवेगार ठेवले.
विकास कामांना वेग
राजाराम महाराजांच्या कारकिर्दीचा काळ स्वातंत्र्य चळवळीचाही काळ होता. कोल्हापुरात तर स्वातंत्र्य चळवळ खूप ताकदीने होती. त्यामुळे त्याचा परिणाम कारभारावर कमीअधिक होत राहिला. पण राजाराम महाराजांनी त्या काळात अतिशय कुशलतेने कारभार हाताळला.
त्या काळात कोल्हापूर नगरपरिषद होती. प्रजा परिषदही जोरात होती. त्यामुळे खूप कसरत करून त्यांनी कारभार केला.26 नोव्हेंबर 1940 साली मुंबईत त्यांचे निधन झाले. राजाराम महाराजांनी कोल्हापुरात खूप विकास कामे केली. लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी ही वसाहत त्यांच्याच काळात वसली.
म्हणजेच कोल्हापूर शहराची पहिली हद्द वाढ त्यांच्याच काळात झाली. कोल्हापूर विस्तारात गेले. आज त्यांचा पुतळा व्हिनस कॉर्नरला आहे. या चौकाचे नावही छत्रपती राजाराम चौक आहे. पण व्हिनस कॉर्नर म्हटले तरच लोकांना माहिती होते, हे तर खूप चुकीचे आहे.