समांतर पुलाच्या प्रतीक्षेत 'राजाराम बंधारा'
कसबा बावडा / सचिन बरगे :
कसबा बावडा येथील कोल्हापूर पद्धतीच्या राजाराम बंधाऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे. या पुलाला पर्यायी असलेल्या समांतर पुलाचे बांधकाम हे ठेकेदाराच्या कामाची पेंडिंग बिले, शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव, राजकीय श्रेयवाद अशा अनेक कारणांमुळे अपूर्ण आहे. वयाची शंभरी पार केलेला राजाराम बंधारा आजही मोडक्या तोडक्या अवस्थेत जनतेच्या सेवेत खंबीरपणे उभा आहे. मानवनिर्मित पूर परिस्थिती आणि वाढते वय पाहता राजाराम बंधाऱ्याला आपले अस्तित्व नष्ट होण्याची भीती जणू जाणवत आहे. या बंधाऱ्याचे अस्तित्व टिकवायचे असल्यास समांतर पुलाचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे.
छत्रपती राजाराम महाराजांनी कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवर १९०८ साली संपूर्ण दगडी बांधकाम असलेला कोल्हापूर पद्धतीचा जगातील पहिला बंधारा बांधला. दररोजची तहान भागवण्यापासून ते शेती, औद्योगिकच्या क्षेत्राच्या वापरासाठी आणि कोल्हापूरला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी या बंधाऱ्याची निर्मिती केली. ११७ वर्षे पूर्ण झालेला राजाराम बंधारा सध्या दयनीय अवस्थेतही तग धरून आहे. मानवनिर्मित चुकांमुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याखाली गेलेला कमी उंची असलेला राजाराम बंधारा प्रतिवर्षी वीस ते पंचवीस दिवस पाण्यातच असतो. बंधाऱ्याचा कालावधी, उंची आणि वयोमानानुसार झालेली दुरवस्था पाहून शासन पातळीवर निर्णय झाला की, राजाराम बंधाऱ्याला नवसंजीवनी देऊन त्याचं अस्तित्व टिकवायचे झाल्यास त्यास समांतर पुल बांधणे गरजेचे आहे. नियोजनानुसार २०१७ मध्ये साडे सात मीटर रुंद आणि १९२ मीटर लांब समांतर पुल बांधणीचे काम सुरू झाले. दोन वर्षात पुलाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याची मुदत होती. पण अनेक कारणामुळे गेली आठ वर्षे झाली या पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे.
भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेत शेतकरी आणि सरकार यांच्यातील बोलणी वारंवार फिस्कटली. त्यामुळे समांतर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या, यामुळे कसबा बावड्यासह आजूबाजूच्या १६ गावांची गैरसोय झाली आहे. ती दूर करायची असेल आणि कोल्हापूर पद्धतीच्या पहिल्या राजाराम बंधाऱ्याचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर येथील अर्थवट अवस्थेतील समांतर पूल पूर्ण होणे गरजेचे आहे.
- एप्रिलपासून पुलाचे काम सुरू करणार
नाबार्डच्या माध्यमातून २०१५ साली राजाराम बधारा समातर पुलासाठी १७कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. त्यानंतर पुलाचे कामही सुरू झाले असून काही लोकांच्या विरोधामुळे तो पूल सध्या अर्थवट स्थितीत आहे. या अर्धवट स्थितीत असलेल्या पुलाचे काम एप्रिलमध्ये पुन्हा सुरू करून येत्या काळात पूर्ण करणार आहे.
-आमदार राजेश क्षीरसागर
१९०८ साली संपूर्ण वगढी बांधकाम असलेला कोल्हापूर पद्धतीचा जगातील पहिला बंधारा छत्रपती राजाराम महाराजांनी पंचगंगा नदीबर बांधला.
११७ बर्षे पूर्ण झालेला राजाराम बंधारा सध्या वयनीय अवस्थेत
२०१७ मध्ये ७.५ मीटर रुंव आणि १९२ मीटर लांब पुल बांधणीचे काम सुरू