Kokan Leopard Death : कोकणात एकाच दिवशी दोन बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू
एका बिबट्याचा फासकीत अडकून तर दुसऱ्याचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
राजापूर, संगमेश्वर : जिल्ह्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये दोन बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहिल्या घटनेत राजापूर-तेरवण येथील आंबा बागेत वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकीत अडकून जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत संगमेश्वर तालुक्यातील महामार्गावरील आरवली येथे मारुती मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला.
राजापूर तालुक्यातील तेरवण येथील एका आंबा बागेत शनिवारी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकीत अडकून जखमी झालेल्या बिबट्याची वनविभागाने सोडवणूक केल्यानंतर उपचार करतानाच त्या बिबट्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय सुमारे 4 ते 5 वर्ष असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
वनविभागाच्यावतीने या मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली. तेरवण येथे भू येथील विजय नारायण सरफरे यांच्या मालकीच्या आंबा बागेमध्ये नर जातीचा बिबट्या फासकीमध्ये अडकल्याचे आनंद राजाराम पाध्ये यांनी मोबाईलवरून वनविभागाला कळविले. यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. बिबट्याच्या हालचालीवरून तो फासकी तोडून फासकी लावण्यात आलेल्या आंबा झाडाची फांदी तोडून बागेलगत झुडपात अडकल्याचे दिसून आले.
वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीमने या बिबट्यास सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले. हा बिबट्या काही प्रमाणात जखमीही झाला होता. यावेळी त्याच्यावर राजापूर पशुधन विकास अधिकारी वैभव चापडे, पशुधन पर्यवेक्षक संतोष गोरे व कोल्हापूर वनविभागाचे डॉ. वाळवेकर यांनी या जखमी बिबट्यावर उपचार सुरु केले. फुफुसाला झालेल्या इन्फेक्शनमुळे तो मृत झाला असावा, असा प्राथमिक अहवाल पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दिले.
मृत बिबट्याचे अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी प्लास्टिकच्या बरणीत घेण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणी रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई व चिपळूण सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट केले.
या कामगिरीसाठी राजापूर वनपाल जयराम बावदाणे, लांजा वनपाल सारीक फकीर, पाली वनपाल न्हानू गावडे, राजापूर वनरक्षक विक्रम कुंभार, वनरक्षक कोर्ले श्रावणी पवार, लांजा वनरक्षक नमिता कांबळे, रत्नागिरी वनरक्षक प्रभू साबणे, जाकादेवी वनरक्षक शर्वरी कदम, कोल्हापूर पशुधन विकास अधिकारी डॉ. वाळवेकर, कांदळवन वनरक्षक किरण पाचारणे, चिपळूण वनरक्षक शिंदे मेजर व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, संतोष चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महामार्ग ओलांडताना बिबट्याला वाहनाची धडक
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवलीमधील मारुती मंदिराजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिबट्या रात्री महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी महामार्गावर पडलेल्या बिबट्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आरवली गावचे सरपंच भुवड, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, गावचे पोलीस पाटील मेने आदी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तत्काळ वनविभागाला ही माहिती दिली. हा बिबट्या दीड वर्षांचा असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.