For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणपतीसाठी गावी निघाले अन् वाटेतच काळाचा घाला! राजापुरात वाहनाचा भीषण अपघात

12:47 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणपतीसाठी गावी निघाले अन् वाटेतच काळाचा घाला  राजापुरात वाहनाचा भीषण अपघात
Advertisement

राजापूर : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून कोकणातील गावी निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनाला रविवारी सकाळी राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनातील आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Advertisement

प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथे जाणाऱ्या प्रवाशांचे फोर्स अर्बेनिया वाहन हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर अपघातग्रस्त झाले. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते.

अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनाची अवस्था पाहता अपघाताच्या भीषणतेची कल्पना येत आहे. अपघातात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते.

Advertisement

अपघाताची माहिती मिळताच हातिवले परिसरातील स्थानिक तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, जखमींची प्रकृती आणि अपघाताचे कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी रवाना होत असताना राजापूरमध्ये घडलेल्या या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Tags :

.