राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्ताकामाला प्रारंभ
दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने नागरिकांतून तीव्र संताप : कामाच्या दर्जाबाबत साशंकता
खानापूर : राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या शहरांतर्गत जाणाऱ्या महामार्गाच्या विकासासाठी एकात्मिक विकास योजनेतून 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. कामाची सुरुवात हेस्कॉम कार्यालयापासून नदीवरील पुलापर्यंत करण्यात आली आहे. मात्र एकाचवेळी दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने रुमेवाडी पलीकडील नंदगडपर्यंत तसेच अनमोडपर्यंतच्या प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व्यापारी वर्गालाही याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी एका बाजूच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. काम गेल्या दहा दिवसापूर्वी हाती घेण्यात आले आहे. शहरातील हा मुख्य रस्ता असून हा रस्ता नंदगड, हल्याळ तसेच गोव्यासाठी संपर्क रस्ता आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाहतुकीसाठी हा मुख्य रस्ता आहे. काम हाती घेतल्यानंतर हेस्कॉम कार्यालयापासून नदी पुलापर्यंत एकाचवेळी कोणतीही सूचना न देता तसेच रस्ता बंद असलेला फलक न लावता दोन्ही बाजूच्या रस्त्याचे खोदकाम केल्याने नागरिकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरांतर्गत रस्त्यावरुन धावणाऱ्या बसेस बाहेरुन जात असल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत. या संपूर्ण परिसरातील व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी कंत्राटदार आणि बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक बाजूचा रस्ता कायमस्वरुपी सुरू ठेवावा, अशी मागणी प्रवासी आणि जनतेतून होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
दर्जाबाबत नागरिकांतून साशंकता
या साडेचार कि. मी. च्या रस्त्यासाठी एकात्मिक विकास योजनेतून केंद्र सरकारने 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. म्हणजेच 1 कि. मी. ला 3 कोटी रुपयापेक्षा जादा निधी मंजूर झाला आहे. मात्र सध्या कंत्राटदाराने सुरू केलेल्या रस्त्याच्या विकासाबाबत शहरातील नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वीचा डांबरी रस्ता खोदून त्याच्यावर रोलर फिरवण्यात येत आहे. यावरच सिंमेट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे. सध्या शहरांतर्गत मऱ्याम्मा मंदिरपासून ते पुलापर्यंत असलेला दुभाजक तसाच ठेवून काम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 10 इंच उंच काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या दुभाजकापेक्षा रस्ता उंच होणार आहे. तसेच दुभाजकाच्या खाली नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आले नसल्यास काहीवर्षातच दुभाजक खचण्याचा धोका आहे. तसेच या संपूर्ण रस्त्याच्या बांधकामात लोखंड सळीचा वापर अजिबात होणार नसल्याने या रस्त्याच्या दर्जाबाबत शांशकता व्यक्त होत आहे.
...तर रस्त्याची दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही
शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दर्जाबाबत तडजोड केल्यास आणि रस्त्याचे बांधकाम योग्यरीतीने झाले नसल्यास रस्त्याची दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही. पुन्हा या रस्त्याच्या विकासासाठी इतका मोठा निधी मंजूर होणे दुरापास्त आहे. यासाठी या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा योग्यपद्धपतीने राखण्यात यावा, अशी मागणी होत आहे.