राजा भैयांच्या अडचणीत वाढ
पत्नीच्या तक्रारीवर एफआयआर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरप्रदेशातील बाहुबली नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांच्या विरोधात दिल्लीतील सफदरजंग पोलीस स्थानकात एफआयआर नोंद झाला आहे. राजा भैया यांच्यावर त्यांच्या पत्नीनेच छळ केलयाचा आरोप केला आहे. पत्नीच्या तक्रारीवर राजा भैया यांच्या विरोधात हा एफआयआर नोंदविला गेला आहे.
राजा भैया यांच्या पत्नी भानवी सिंह यांनी पतीच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे गंभीर आरोपांसह तक्रार नोंदविली आहे. भानवी सिंह यांनी पतीवर शारीरिक आणि मानसिक क्रूरतेचा आरोप केला आहे. राजा भैया यांनी अनेक वर्षांपर्यंत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा भानवी यांचा आरोप आहे.
सतत होणाऱ्या मारहाणीमुळे माझ्या शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान झाले आहे. माझ्या जीवाला धोका असल्याचे भानवी यांनी स्वत:च्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली होती.
राजा भैया आणि त्यांच्या पत्नी भानवी यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे. दोघांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. दोघांना या नात्यापासून 4 अपत्यं आहेत. काही वर्षांपासून भानवी सिंह या दिल्लीतील स्वत:च्या निवासस्थानी राहत आहेत.
प्रतागढच्या कुंडा बेती येथील रहिवासी राजाभैया हे उत्तरप्रदेशच्या राजकारणातील मातब्बर नेते आहेत. राजा भैया यांनी 1993 पासून सलग 7 वेळा कुंडा विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला आहे. राजा भैया हे बेती आणि भदरीचे राजपुत्र देखील आहेत. तसेच ते यापूर्वी राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.