राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची दिल्लीत भेट; मनसे एनडीएमध्ये सामिल
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत असतानाच आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली. लोकसभेसाठी भाजपबरोबर येण्यासाठी मनसेने दोन जागांची मागणी अमित शहा यांच्याकडे केली आहे. दोन नेत्यांच्या या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकिय घडामोडी आणि जोडण्यांना गती मिळण्याची शक्यता आहेत.
राज ठाकरे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आणि नवनिर्माणचे युवासेनाध्यक्ष अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एनडीएमध्ये सामिल होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन योग्य वेळ आल्यावर सूचना दिल्या जातील असे निर्देश दिले होते.
त्यानंतर झालेल्या राजकिय घडामोडीमध्ये राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे तातडीने सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असून एनडीए मध्ये सामिल होण्यासाठी राज ठाकरे यांनी अमित शहांकडे 2 जागांची मागणी केली असल्याचं समजते. यामध्ये दक्षिण मुंबई आणि शिर्डी आणि नाशिक यापैकी एक या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.