For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक आयोगातील मतभेदांवर राज ठाकरे आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

11:56 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगातील मतभेदांवर राज ठाकरे आक्रमक  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
Advertisement

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांच्यातील मतभेदांच्या वृत्तानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली.

Advertisement

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी गेल्या 10 महिन्यांत दोन निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या काही निर्णयांवर 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचा मुद्दा उपस्थित केला. मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे वगळणे तसेच पुन्हा समाविष्ट करणे आणि ‘फॉर्म-6’मधील बदलांसह काही निर्णयांवर हे आक्षेप असल्याचे वृत्त आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबतही प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते, आयोगातील दोन आयुक्तांनी नोंदवलेले आक्षेप गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

Advertisement

याशिवाय राज ठाकरे यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत सर्व विरोधी पक्षांनी यासाठी एकत्रितपणे आंदोलन करण्याचे आवाहन केले. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत संबंधित निर्णयांमागील जबाबदारीची चौकशी करण्याचीही मागणी केली.

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टच्या शेवटी मतदारांच्या मतदानाबाबत प्रश्न उपस्थित करत, ‘आमची मतं कोण चोरतं आणि त्यांना कशी आणि कोणाची मदत मिळते’, असा सवाल केला. या विधानामुळे त्यांच्या पोस्टचा शेवटचा भाग विशेष चर्चेत आला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने आयोगातील निर्णयांबाबत अंतर्गत मतभेद असल्याचे वृत्त फेटाळले असून, SIRसह इतर निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीने घेतले जात असल्याचे आयोगाच्या सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोप आणि आयोगाची अधिकृत भूमिका यांच्यात मतभेद असल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :

.