For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिंदे-राज ठाकरे यांच्या भूमिकेला 'बीएमसी'ची किनार!

10:56 AM Apr 20, 2025 IST | Snehal Patil
शिंदे राज ठाकरे यांच्या भूमिकेला  बीएमसी ची किनार
Advertisement

भाजपला येथील सर्वात मोठा पक्ष व्हायचं आहे, ते करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना योग्य अंतरावर ठेवायचे आहे.

Advertisement

By : संतोष पाटील

कोल्हापूर : तब्बल पन्नास हजार कोटींचे वार्षिक बजेट आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी रणनिती आखत आहे. भाजपला येथील सर्वात मोठा पक्ष व्हायचं आहे, ते करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना योग्य अंतरावर ठेवायचे आहे. भाजपची मदार हिंदी भाषिकांवर असतानाच मनसे प्रमुख यांनी हिंदी विरोधाची आरोळी दिली. तर शिंदे यांनी ठाकरेंची भेट घेऊन शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले.

Advertisement

भाजप-शिंदे आणि राज ठाकरे यांच्या त्रिकोणाला हिंदी भाषा समर्थन आणि विरोधाची किनार आहे. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुका येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. मुंबईची ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका तसेच राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू असल्याने येथील राजकारणाला विधानसभा निवडणुकी इतकेच महत्त्व आहे. मागील काही वर्षात शिवसेनेची पर्यायाने उध्दव ठाकरे यांची येथील राजकारणावर मजबूत पकड होती. ती कायम ठेवण्याचे आव्हान ठाकरे सेनेपुढे असेल. तर मुंबईतील सर्वात मोठा पक्ष होण्याची रणनिती आखणारा भाजपची मदार हिंदी भाषिक मतदारांवर आहे.

शिंदेच्या शिवसेनेला मुंबईतील पक्के स्थान म्हणजे राज्यातील राजकारणावर मोहोर उमठवणारे असल्याने ते महत्त्वाचे आहे. भाजपला आपले इप्सित साध्य करताना शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला योग्य अंतरावर ठेवण्याचे दिव्य करावे लागणार आहे. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीचा मुद्दा तापवला, ही हवा गरम असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले.

काँग्रेस देशव्यापी असल्याने हिंदी मुद्यावर कोंडी झाली. तर शिवसेना बीएमसीमुळे ठोस भूमिका घेऊ शकत नसल्याने हिंदीमुळे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेटीचे कारण-राजकारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी स्नेहभोजनाच्या निमित्ताने भेट घेतली. शिंदे यांनी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगत, त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिल्याचा दावा केला. मात्र, बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मनसे-शिवसेना यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेमुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे.

शिंदे यांची राज ठाकरे यांच्याशी जवळीक ही दबावाच्या राजकारणाचा भाग असू शकते, यातून महायुतीतील अंतर्गत असंतोष कमी करण्याचा आणि बीएमसीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न मानला जातो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्याविरुद्ध उभे होते. शिंदे यांनी आपला उमेदवार मागे न घेतल्याने अमित ठाकरे यांचा पराभव झाला, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये झालेला तणाव शिंदे-ठाकरे यांच्या डिनर डिप्लोमॅसीने निवळण्यास मदत झाली.

सत्ताधारी महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीची चर्चा आहे. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी स्वतंत्रपणे भेट घेतल्यानंतरही हा तणाव कायम असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसात शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्याशी अनेकदा भेटी घेतल्या, ज्यामुळे युतीच्या शक्यतेच्या चर्चांना बळ मिळाले.

संभाव्य राजकीय समीकरणे

महायुतीची एकजूट :  शिंदे गट, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटल्यास महायुती शिवसेनाला (उबाठा) कडवी टक्कर देऊ शकते.

मनसे-शिंदे युती :  राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक बीएमसीमध्ये नवे समीकरण निर्माण करू शकते. यामुळे मराठी मतांचे विभाजन टळेल.

महाविकासची रणनीती : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थानिक मुद्दे आणि भ्रष्टाचारविरोधी प्रचारावर भर देत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा अल्पसंख्याक आणि मध्यमवर्गीय मतदारांमधील प्रभाव महाविकासला बळ देऊ शकतो.

हिंदी विरोधाचा फायदा कोणाला?

गेल्या 25 वर्षांपासून बीएमसीवर शिवसेनेची सत्ता आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मिता आणि स्थानिक मुद्यांवर जोर देत मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी शिंदे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. मनसेचा मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा शिंदे गटाला मजबूत करू शकतो. राज ठाकरे यांचे हिंदी विरोधी आंदोलन हे मराठी मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.

यामुळे मनसेला निवडणुकीत स्थानिक पातळीवर बळ मिळू शकते, परंतु हिंदी भाषिक मतदारांमध्ये नाराजीची शक्यता आहे. याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. हिंदी भाषिकांचे झालेले ध्रुवीकरण यानिमित्ताने भाजपच्या पथ्यावर पडेल. शिंदे-ठाकरे युतीने मराठी मतांची विभागणी झाल्याने ठाकरे शिवसेना बॅकफुटवर जाईल. निवडणुकीनंतर राज ठाकरे सवता सुभा मांडतील किंवा महायुतीला बाहेरुन पाठिंबा देतील. मुंबईत राज्यातील सत्तासुत्राप्रमाणे भाजप-शिंदे आणि पवार एकत्र येत सत्ता विभागणी घेतील, अशी अटकळ बांधली जात आहे. काही झाले नाही तरी राज ठाकरे भेट ही महायुतीत बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीही शिंदेना मदतगार ठरु शकते.

राज ठाकरे यांचे हिंदीविरोधी आंदोलन :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी करत हिंदी भाषा सक्तीच्या शिक्षणाला विरोध दर्शवला आहे. मनसेने मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा जोरकसपणे उचलला असून, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरात यासंदर्भात आंदोलन तीव्र केले आहे.

Advertisement
Tags :

.