Raj-Uddhav Thackeray Yuti : राज-उद्धव ठाकरे यांची टाळी वाजेल काय?
मनसे आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात युती होण्याचे चित्र मात्र राज आणि उद्धव यांच्या टाळीने रंगत
By : संतोष पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची तयारी दाखवत राज ठाकरे यांनी टाळी दिली. उद्धव यांनी तत्काळ प्रतिटाळी दिली. अर्थात भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबत मैत्री तोडण्याची अट घालूनच! दरम्यान, हिंदी भाषेच्या विरोधावरुन भाजपची कोंडी करणाऱ्या राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतले. या घटनांचा फायदा भाजपलाच होईल, असे दिसते. तथापि त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शिवाय ही एकमेकांना दिलेली टाळी प्रत्यक्षात वाजणार नाही, अशा प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 एप्रिलला राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी स्नेहभोजनाच्या निमित्ताने भेट घेतली. शिंदे यांनी ही भेट केवळ सदिच्छा भेट सांगत, त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्याचा दावा केला. शिंदे यांची राज ठाकरे यांच्याशी जवळीक ही दबावाच्या राजकारणाचा भाग असू शकते, यातून महायुतीतील अंतर्गत असंतोष कमी करण्याचा आणि बीएमसीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न मानला जात होता.
मनसे आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात युती होणारच असे चित्र रंगवले जात असतानाच राज आणि उद्धव यांच्या टाळीने रंगत आणली. राज ठाकरे यांची शनिवारी अभिनेता महेश मांजरेकर यांनी यूट्युब चॅनेलला घेतलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार काय? या प्रश्नावर राज ठाकरे यांनी, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे.
या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं, एकत्र रहाणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही, असे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी या वक्तव्यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मीही तयार आहे. परंतु, एकीकडे त्यांना (शिवसेना, शिंदे गट आणि भाजपला) पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करायचा असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही, त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा, अशी सशर्त अट घालत मनोमीलनावर एक पाऊल पुढे टाकले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री उदय सामंत हेही मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे यांना भेटले होते. मंत्री दादा भुसे यांनीही राज ठाकरे यांची याच दरम्यान भेट घेतली होती. शिंदे सेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच दोन भाऊ एकमेकाला टाळ्या देण्याच्या बाता करु लागले. यावर सावध भूमिका घेत उदय सामंत यांनी, राज ठाकरे यांचा राजकीय स्वभाव पाहता, कोणाच्या अटींच्या अधीन राहून ते निर्णय घेतील असे वाटत नाही, त्यांचा स्वतंत्र विचार आहे, ते त्यावर ठाम असतात. ही माझी अट आहे, ती मान्य करुन माझ्याकडे ये, असं कोणी सांगितलं तर ते ऐकतील असं वाटत नाही. असे सांगत ही टाळी वक्तव्यापुरतीच राहावी असे संकेत दिले.
हिंदीच्या मुद्यावर भाजपसह राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणारे खासदार संजय राऊत दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, महाराष्ट्र विरोधी शक्तीविरोधात राहणे योग्य नाही. भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व मिटवायचं आहे. त्यांना ठाकरे हे नावच संपवायचं आहे. अशा स्थितीत दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद दिला असेल तर महाराष्ट्र त्याचे स्वागत करतोय. तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी 2017 चा पालिका निवडणुकीचा अनुभव पाहता हे शक्य नाही असे वाटते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोणालाही युतीचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.
सारे काही मुंबई महानगरपालिकेसाठी
तब्बल 50 हजार कोटींचे वार्षिक बजेट आणि राज्याची राजधानी-देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुबंई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी रणनीती आखत आहे. भाजपला येथील सर्वात मोठा पक्ष व्हायचं आहे. ते करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना योग्य अंतरावर ठेवायचं आहे. भाजपची मदार हिंदी भाषिकांवर असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी विरोधाची आरोळी दिली. तर शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले. भाजप-शिंदे आणि राज ठाकरे यांच्या त्रिकोणाला हिंदी भाषा समर्थन आणि विरोधाची किनार आहे.
उध्दव ठाकरे यांना बीएमसी निवडणुकीच्या निमित्ताने ताकद दाखवून विधानसभेचा वचपा काढायचा आहे. ठाकरेंचा महाविकास आघाडीत वरचष्मा राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीतून युतीचे संकेत देत, भाजप अर्थात महायुतीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला. तर उध्दव ठाकरे यांनी राज यांना प्रतिसाद दिल्याने महाविकास आघाडी पर्यायाने काँग्रेसचे टेन्शन वाढवले आहे. राज ठाकरे यांची भूमिका निश्चित होत नाही तोपर्यंत भाजप तटस्थ भूमिकेत दिसेल. राज आणि उध्दव एकत्र आले तर शिंदे सेनेचे खच्चीकरण करण्याची आयती संधी भाजपला मिळणार आहे.
काहीही घडले तरी, फायदा भाजपचाच...
राज ठाकरे यांच्या हिंदी विरोधातील आंदोलनामुळे हिंदी भाषिकांचे होणारे ध्रृवीकरण भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे. शिंदे-ठाकरे यांची संभाव्य युती मराठी मतांची विभागणी होऊन उध्दव ठाकरे शिवसेनेला बॅकफूटवर जाणारी ठरु शकते. राज आणि उद्धव एकत्र आल्यास मराठी मतांची विभागणी टळणार असली, तरी याचा थेट दणका शिंदे सेनेला बसू शकतो. सध्याचा हिंदी विरोध असो, दोन्ही भावांची टाळी देणे असो किंवा शिंदे-राज ठाकरे यांचे प्रीतीभोजन; या सगळ्या घडामोडींमुळे भाजपचे कोणतेही राजकीय नुकसान तूर्तास दिसत नाही.