मार्केट यार्डात बेदाण्याला किलोला विक्रमी ३७१ भाव
सांगली :
येथील मार्केट यार्डातील नवीन हंगामातील बेदाणा सौदा सुरू झाला. बुधवारी सौद्यात किलोला विक्रमी ३७१ भाव मिळाला. हा हिरवा बेदाणा विजयकुमार आमगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला. चालू वर्षी नवीन बेदाणा हंगाम लवकर सुरू झाला असून होळी व रमजानच्या मुहूर्तावर बेदाणा खरेदीसाठी देशभरातील व्यापारी सांगली मार्केट यार्डात दाखल झाले आहेत. बुधवारी पप्पू मजलेकर यांच्या दुकानात मल्लिकार्जुन सातलगाव (रा. कातराळ) यांच्या हिरवा गोल बेदाण्यास चालू हंगामातील उच्चांकी भाव ३७१ प्रति किलो दराने प्रवीण यादवाडे यांनी खरेदी केला. गुरुबसवेश्वर ट्रेडिंग कंपनी यांच्या दुकानात चनबसू गुजरे (संख) या शेतकऱ्याचा लांब सुटेखानी बेदाणा ३२१ दराने भाग्यश्री एंटरप्राईजेसने खरेदी केला. सौद्यात कमीत कमी ६० सरासरी १५० किलोला दर मिळाला. ३५ हजार ७८० किलो बेदाण्याची आवक, २५ हजार ५० किलो विक्री झाली. द्राक्ष उत्पादन कमी असल्याने बेदाण्यालाही चांगला दर राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. संचालक पप्पू मजलेकर, पवन चौगुले, अभिजीत पाटील, वृषभ शेडबाळे, अनिल पटेल, शेखर ठक्कर, अश्विन पटेल, रवी हजारे, दिगंबर यादव, विनीत गड्डे, विनोद कबाडे, प्रवीण यादवाडे, नितीन अट्टल, सचिन चौगुले, शाकिर पिंजारी, सुनील खोत, देवेंद्र करे, मनोज मालू आदीसह व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी नवीन बेदाणा सांगली मार्केटमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले.