Rainy Tourism: हुल्लडबाजी टाळा वर्षा पर्यटनाचा आनंद लुटा, धोका ओळखून नियमांचे पालन करा
वर्षा पर्यटन करताना काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली
कोल्हापूर : पावसाळ्यात सहलीला जाताना धबधबे, कडे, खोल दरी, पाण्याची ठिकाणे आणि वेगाने वाहणारे नदी-नाले यांसारख्या ठिकाणी पर्यटक आणि प्रशासनाने कोणती काळजी घ्यावी आणि कोणते नियम पाळावे, याची माहिती..
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. सावधगिरी बाळगली असती तर कदाचित निष्पात जीव वाचले असते. वर्षा पर्यटन करताना काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली. वर्षा पर्यटनाच्या नावाखाली अलिकडे हुल्लडबाजी वाढली आहे.
जीव धोक्यात घालून रिल्स बनवून सोशल मीडियातील हिटस वाढवण्याचा प्रकार जीवघेणा ठरत आहे. स्वयंशिस्तीने प्रशासनाच्या सहकार्याने सूचनांचे पालन करत, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटणे शक्य आहे, असे मत ‘तरूण भारत संवाद’ आयोजित राऊंड टेबलमधील चर्चासत्रात बुधवारी मान्यवरांनी व्यक्त केले.
‘तरुण भारत संवाद’तर्फे आयोजित चर्चासत्रात सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यटन व प्रवास सुविधा केंद्राच्या समन्वयक डॉ. मीना पोतदार, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, ट्रॅवेलाचे कृष्णराव माळी, ज्येष्ठ पर्यटन अभ्यासक अरुण सावंत, गिर्यारोहक अनिकेत जुगदार, जीवरक्षक दिनकर कांबळे, वन विभागाचे अधिकारी विलास काळे आणि राजेंद्र सावंत यांनी सहभाग घेतला.
वर्षा पर्यटनाचे महत्व
निसर्गाशी संवाद : पावसाळ्यात नद्या, धबधबे आणि जंगले आपल्या पूर्ण रंगात दिसतात. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळते आणि शहरी जीवनातील तणाव कमी होतो.
साहसी पर्यटनाला चालना : पावसाळा हा ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, कॅम्पिंग आणि वन्यजीव सफारीसारख्या साहसी गोष्टींसाठी आदर्श आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, ट्रेकिंग मार्ग आणि नद्यांचे खळाळते प्रवाह साहसप्रेमींना आकर्षित करतात.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना : वर्षा पर्यटनामुळे स्थानिक हॉटेल्स, रिसॉर्ट्स, गाईड्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि छोट्या व्यवसायांना फायदा होतो. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
सांस्कृतिक आणि धार्मिक आयाम : पावसाळा हा सण, धार्मिक उत्सवांचा काळ आहे. अनेक धार्मिक स्थळांना, विशेषत: मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांना, पावसाळ्यात भेट देण्याचा वेगळा आनंद आहे.
पर्यावरण जागरूकता : पावसाळी पर्यटनामुळे पर्यटकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढते. जंगल सफारी, अभयारण्य भेटींदरम्यान वन्यजीव आणि जैवविविधतेचे महत्व समजते.
वर्षा पर्यटनाचे आकर्षण गेल्या दशकात झपाट्याने वाढले आहे. त्याची प्रमुख कारणे :
1. सोशल मीडियाचा प्रभाव : इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर वर्षा पर्यटनस्थळांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. धबधबे, धुके आणि हिरवळीची दृश्ये पर्यटकांना नवीन ठिकाणांचा शोध घेण्यास प्रेरित करतात.
2. शहरीकरण आणि निसर्गाची आस : शहरी भागातील तरुणांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून सुटका हवी असते. पावसाळ्यातील निसर्गरम्य ठिकाणे त्यांना शांतता आणि साहस दोन्ही प्रदान करतात.
3. सुधारित पायाभूत सुविधा : रस्ते, हॉटेल्स, गाईड्स आणि पर्यटन सुविधांमुळे पावसाळी पर्यटन अधिक सुलभ झाले आहे. कोल्हापूरसारख्या ठिकाणी उत्तम रस्ते आणि पर्यटकांसासाठी सुविधा उपलब्ध आहेत.
4. नवीन पर्यटन प्रकार : पावसाळ्यात अनेक नवनवीन पर्यटन प्रकार, जसे की इको-टूरिझम आणि अॅग्रो टूरिझम, लोकप्रिय होत आहेत. यामध्ये शेतातील जीवन, स्थानिक संस्कृती आणि निसर्गांचा अनुभव घेणे समाविष्ट आहे.
5. योग्य तयारी : जलरोधक जॅकेट, मजबूत पकड असलेले शूज आणि गरम कपडे सोबत ठेवा. साहित्य ओले होऊ नये यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, जलरोधक बॅकपॅकचा वापर करा. आवश्यक प्राथमिक उपचार किट, नियमित औषधे सोबत ठेवा. पुरेसे पिण्याचे पाणी आणि हलके, ऊर्जा देणारे खाद्यपदार्थ ठेवा. मोबाईल फोन पूर्ण चार्ज केलेला असावा आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी संपर्कासाठी पर्याय शोधा.
जागेची निवड आणि माहिती
ज्या ठिकाणी जात आहात, त्याबद्दल आधीच माहिती मिळवा. ते ठिकाण सुरक्षित आहे का, तिथे काही धोके आहेत का, याची चौकशी करा. शक्य असल्यास स्थानिक मार्गदर्शकासोबत जा, त्यांना त्या परिसराची उत्तम माहिती असते. एकट्याने प्रवास करण्याऐवजी ग्रुपमध्ये जा, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत मदत मिळू शकेल.
सुरक्षिततेसाठी नियम
धबधब्यांच्या अतिशय जवळ जाऊ नका, कारण पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असतो आणि पाय घसरण्याची शक्यता असते. कड्यांच्या अगदी टोकावर जाऊ नका. सेल्फी काढताना सावधगिरी बाळगा. कड्यांवरून खाली बघताना तोल जाण्याची शक्यता असते.
भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांमध्ये उतरू नका. प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि ते धोकादायक ठरू शकते. तलाव, नद्या किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी खोलवर जाऊ नका, पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज घ्या. पायवाट निसरडी असू शकते, त्यामुळे हळू आणि सावधगिरीने चाला. प्रशासनाने लावलेले धोक्याचे सूचना फलक आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करा. स्थानिक प्रशासन किंवा बचाव पथकांच्या सूचनांचे नेहमी पालन करा
पाळत आणि सुरक्षा कर्मचारी
महत्त्वाच्या आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षारक्षक, जीवरक्षक किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. पर्यटकांच्या गर्दीनुसार आणि वेळेनुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी.
नियमांची अंमलबजावणी
पाण्यात उतरण्यास किंवा धोकादायक ठिकाणी जाण्यास सक्त मनाई असावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. मद्यपान करून धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध घालावा.
मनापासून इच्छा असणारे गडावर येतील
गडकिल्ल्यांवर सुविधा उपलब्ध केल्याने ऐतिहासिक स्थळांवर पोहोचणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे गडांवर हुल्लडबाजींचे प्रमाण वाढत आहे. गडांची ऐतिहासिक ठेवण कायम राखली पाहिजे. ज्यांचे गडकिल्ल्यांवर मनापासून प्रेम आहे. तेच येथे पोहोचतील आणि केवळ दंगामस्ती करण्यासाठी गडकिल्ल्यांवर येणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असे कृष्णराव माळी यांनी सांगितले.
वासोटा किल्ल्याप्रमाणे तपासणी व्हावी
वासोटा किल्ल्याच्या परिसरात प्रशासनाकडून प्रत्येकाच्या साहित्याची तपासणी करून नोंद करून घेतली जाते. तेथून बाहेर पडताना पुन्हा तपासणी होते. त्यामुळे हुल्लडबाजांव्ना आळा बसत आहे. याचप्रमाणे प्रशासनाने इतरही पर्यटनाच्या ठिकाणी तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत अरूण सावंत यांनी व्यक्त केले.
पन्हाळा - पावनखिंड मोहिमेला पसंती
पावसाळ्यात निघणाऱ्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेला गिर्यारोहकांची पसंती मिळत आहे. देशभरातून शिवप्रेमी या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत. वाढलेली संख्या पाहता मोहिमांच्या आयोजक संस्थांची संख्याही वाढत आहे. मोहिमेला जाताना आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी अनुभवी संस्थांसोबत मोहिमेला जाणे सुरक्षित असणार आहे, असे प्रमोद पाटील यांनी सांगितले.
अलमट्टीच्या धर्तीवर पर्यटन विकास आवश्यक
अलमट्टी धरणाचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केला आहे. सुमारे 4 कोटींच्या निधी तेथे खर्च केला आहे. वर्षाला येथून 4 कोटींची उलढाल होते. याच धर्तीवर जिल्ह्यात पर्यटन विकास करण्याची आवश्यकता असल्याचे विलास काळे यांनी सांगितले.
रिल्स पाहून पर्यटन धोक्याचे
सध्या पर्यटनस्थळी जाऊन रिल्स बनवण्याचै नवीन फॅशन रुजत आहे. यामुळे पर्यटनासोबत धोकेही वाढत आहेत. रिल्स पाहून त्या ठिकाणी कसे जायचे, याचा शोध घेतात. मात्र त्या ठिकाणी किती धोका आहे, सुरक्षिततेच्या काय उपाययोजना आहेत, याची माहिती घेतली जात नाही. त्यामुळे धोका वाढत आहे.
बेभान तरूणांना रोखण्याची गरज
ज्या ठिकाणी पोहोचता येत नाही, अशा हिडन पाईंटच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढली जाते. तसेच रिल्स केले जातात. तरूणांमध्ये आता ही क्रेझ वाढली आहे. अशा ठिकाणाची भौगलिक माहिती न घेता तेथे जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. केवळ सोशल मीडियावरील स्टंटबाजीच्या मोहासाठी यापूर्वी अनेकांनी जीव गमवल्याच्या घटना घडल्या आहेत. या बेभान तरूणांना रोखण्याची गरज असल्याचे मत सम्राट केरकर यांनी व्यक्त केले.
स्वतंत्र वाहतूक व्यवस्था पर्यटनस्थळी आवश्यक
काश्मिरमध्ये पर्यटनाच्या ठिकाणी जाण्यासाठी तेथील प्रशासकीय यंत्रणेची स्वतंत्र वाहन सेवा असते. त्यामुळे पर्यटनस्थळी वाहतूक कोंडी होत नाही. याप्रमाणे कोल्हापुरातील आंबोलीसह अन्य पर्यटनाच्या ठिकाणी वाहनांची सुविधा देणे आवश्यक आहे.
पर्यटनस्थळी मद्यपींवर कारवाईची गरज
पर्यटनासाठी सहकुटूंब नागरिक येत असतात, परंतु अगोदरच तेथे काही मद्यपींकडून हुल्लडबाजी सुरू असते. याचा सहकुटुंब वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्यांना त्रास होतो. परिणामी अशा घटनांत कारवाई होण्याची गरज आहे.
पर्यटनातंर्गत घडलेल्या दुर्घटना
- दूधगंगा नदी काळम्मावाडी धरण परिसरात एकाच महिन्यात तिघे बुडाले
- तोरस्करवाडी येथील धबधब्यामध्ये दोघे जण बुडाले
- राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये इचलकरंजी येथील दोघांचा मृत्यू
- माऊली कुंड न्यू करंजे एक जण बुडाला कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 25 ते 30 पर्यटक वाहून गेले. यामध्ये 6 जण मृत झाले.
- गतवर्षी पुणे येथील भुसी धरणाच्या प्रवाहात पर्यटक कुटूंब वाहून गेले.
- 27 मे 2025 रोजी पर्यटकांची मिनी बस कास परिसरातील भांबवली वजराई धबधबा पाहून परतताना ब्रेक फेल झाल्याने 18 जण जखमी झाले.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी ग्राम समिती असावी
स्वयंशिस्त लावण्यासाठी ग्रामपंचायतींना पाठबळ देणे गरजेचे आहे. पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राम समिती तयार करा. पर्यटन स्थळावर जाण्यासाठी तिकीट आकारले पाहिजे. यातून गावातील तरुणाईला रोजगार मिळेल. स्थानिकांनी दिलेल्या सुचनाचे पालन केले पाहिजे. एखादा ट्रेक आयोजित करत असताना त्यांनीही आपल्या बरोबर आलेल्या पर्यटकांची काळजी घेतली पाहिजे. स्थानिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल पाहिजे. शासनाने पर्यटनस्थळावर त्या गावातील तरुणांचे ग्रुप करुन त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते आलेल्या पर्यटकांना ते माहिती देऊ शकतील. आणि घडणाऱ्या घटना टळतील.
- प्रमोद पाटील, हायकर्स संघटना
सेल्फी रील हुलडबाजी म्हणजे पर्यटन नव्हे
पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. पण तरुणाईकडून पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा हुल्लडबाजी अधिक केली जात आहे. रिल, सेल्फी, हुल्लडबाजी म्हणजे पर्यटन नव्हे. तरुणांचे मन पर्यटनाचे नाही तर हुल्लडबाजीचे आहे. यामुळे निसर्गाला बाधा पोहोचत आहे.वन विभागाकडून पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पर्यटकांनी पालन करावे. पर्यटनामुळे विकास होतो, त्यामुळे पर्यटन वाढले पाहिजे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ज्या गावात पर्यटन स्थळ आहे त्या गावाने पैसे घेऊन लाईफ जॅकेट पुरवावे. स्थानिक पदार्थच पर्यटकांना द्यावेत.
- विलास काळे, सहायक वनसंरक्षक, कोल्हापूर
पर्यटनाबरोबर स्थानिक सामुदायिक रोजगार वाढावा
जिल्हा पर्यटन, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य आहे. कोल्हापुरी पॅटर्न राबवण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. हुल्लडबाजी रोखण्याचे काम एकट्या प्रशासनाला शक्य नाही. त्यासाठी स्थानिकांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यटनस्थळाच्या ठिकाणी रोजगारही निर्माण व्हावेत. पर्यटक नसतात, यावेळी शेणवडी (गगनबावडा), गोठणे (शाहूवाडी), आडोली (राधानगरी) येथील स्थानिक लोक सामुदायिकरित्या वृक्षारोपण, श्रमदान, भात लावणीचे काम करत आहेत. गोठणेमध्ये सामुदायिक रोजगार म्हणून गोडदी बनवून त्याची विक्री सुरू आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. हा कोल्हापुरी पॅटर्न जिल्ह्यातील प्रत्येक पर्यटन ठिकाणी रूजवावा, असा आमचा प्रयत्न सुरू आहे.
- कृष्णराव माळी, ट्रॅव्हेला कंपनी
पर्यटन स्थळाचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले पाहिजे
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. अपघात रोखण्यासाठी सरकारने सर्व पर्यटनस्थळांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. पर्यटनस्थळावरील खुष्कीचे मार्ग बंद केल्यास हुल्लडबाजी रोखण्यास मदत होईल. पर्यटनस्थळी तिकीट आकरावे. स्थानिक लोकांना गाईड म्हणून नेमल्यास पर्यटकांना अचूक माहितीसह रोजगाराची संधी मिळेल. पन्हाळा परिसरातील मसाई पठाराप्रमाणे भुदरगड किल्ल्यावरही विविध दुर्मिळ वनस्पतींची फुले फुलतात. ही जैवविविधता संवर्धनासाठी या दोन्ही ठिकाणी वाहनांना बंदी घालावी. पर्यटकांना गडकिल्ल्यांवरील जैवविविधतेची अचूक माहिती मिळण्यास मदत होते.
- डॉ. मीना पोतदार, पर्यटन, प्रवास सुविधा केंद्र समन्वयक, कोल्हापूर
नैसर्गिक अधिवासात हस्तक्षेप नको
सध्याची तरूणाई इतरांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनामध्ये हुल्लडबाजी होते. पर्यटनाला येणाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळल्यास दुर्दैवी घटना टाळल्या जाऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नैसर्गिक अधिवासाची माहिती कमी वेळेत अनेक लोकांपर्यंत पोहचत आहे. मात्र, नैसर्गिक अधिवासात होणारा हस्तक्षेप टाळला पाहिजे. जंगलातील नैसर्गिक अधिवासातील पर्यटनास बंदी घातली पाहिजे. नैसर्गिक धबधबे, पाण्याची ठिकाणे, डोंगर-कपारींची माहिती घेऊनच पर्यटनाला जावे. केवळ गर्दी वाढली म्हणजे पर्यटन वाढले, असे नाही. रोजगार किती उपलब्ध झाला आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
- सम्राट केरकर, अध्यक्ष, बायसन नेचर क्लब
अनुभवी संस्थेसोबतच ट्रेकिंगला जा..
ट्रेकिंगसारख्या साहसी उपक्रमासाठी योग्य नियोजन आणि अनुभवी मार्गदर्शक आवश्यक आहेत. कोणत्याही ट्रेकवर निघण्यापूर्वी आपण ज्या संस्थेबरोबर जात आहोत, त्या संस्थेची पार्श्वभूमी, ट्रेक लीडरचा अनुभव आणि त्यांचा आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याचा अनुभव तपासणे अत्यंत गरजेचे आहे. ट्रेकिंगसाठी योग्य साहित्य अत्यावश्यक आहे. प्रथमोपचाराची किट, पाणी व पुरेसे खाद्यपदार्थ सोबत ठेवा. ट्रेकिंग करताना निसर्गाच्या जवळ जाता येते, पण त्यात धोकेही असतात. अनुभवी ट्रेक लीडरच्या मार्गदर्शनाखालीच सहभागी होणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरते.
- अनिकेत जुगदार, गिर्यारोहक, कोल्हापूर
ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपा
कोल्हापूरचा निसर्गसंपन्न ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर पर्यटनस्थळांवरील प्रदुषण रोखले पाहिजे. ऐतिहासिक वास्तुंवर सहज रस्ते आणि इतर सुविधांमुळे सोपे झाल्याने निसर्गाचा निखळ आनंद घेणाऱ्या पर्यटकांसह हुल्लडबाजी करणाऱ्यांचा वावर वाढला आहे.
काही हुल्लडबाज तिथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करतात, मद्यप्राशनही सुरू असते. यासाठी पोलीस, वन विभाग आणि ग्रामस्थांमध्ये समन्वय असला पाहिजे. पूर्वी कात्यायणी डोंगर परिसरात समृध्द निसर्ग होता, पण हल्ली होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे तिथे असणारे पक्षी व प्राण्यांवर देखील त्यांचा परिणाम होत आहे.
- अरूण सावंत, सायकलपटू, ट्रेकर, कोल्हापूर
वर्षा पर्यटनासाठी गणेशोत्सवानंतर जावे
वर्षा पर्यटनाच्या निमित्याने धबधबे पाहण्यासाठी मान्सून पावसाच्या पहिल्या टप्यात जाऊ नका. कारण या वेळी उन्हामुळे भेंगाळलेले दगड व वाळलेल्या झाडाच्या फांद्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येत असल्याने, त्या डोक्यात, या अंगावर पडून जायबंदी होण्याची शक्यता असते. त्यामुळे धबधबे पाहण्यासाठी गणेशोत्सवानंतर जाणे अधिक फायद्याचे आहे. तसेच धबधब्याच्या ठिकाणाची भौगलिक परिस्थितीची माहिती आणि गाईडलाईन घेऊनच, वर्षा पर्यटनाला जावे. पर्यटनादरम्यान जीवावर बेतेल, असे वर्तन कदापिही कऊ नका. त्याचबरोबर वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकरीता वन विभागाच्या गेटपासची सक्ती सर्वत्र झालीच पाहिजे. या सक्तीमुळे वर्षा सहलीवेळी होणाऱ्या दुर्घटनाला आळा बसेल, त्यादृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.
- दिनकर कांबळे, जीवरक्षक