हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर
72 रस्ते बंद, पडझडीमुळे 1,265 कोटींचे नुकसान
वृत्तसंस्था/ चंदीगड
हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पूर आणि भूस्खलन यासारख्या घटनांमुळे 72 रस्ते बंद करण्यात आले आहेत. शिमला, मंडी, कुल्लू, उना, सिरमौर आणि लाहौल जिह्यात बरेच रस्ते बंद झाले आहेत. रस्त्यांसोबतच 10 वीज आणि 32 पाणीपुरवठा योजनाही खंडित झाल्या आहेत. 27 जून रोजी मान्सूनचे आगमन झाल्यापासून राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, असून स्थानिक हवामान विभागाने 1 आणि 2 सप्टेंबर रोजीही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पावसामुळे राज्याचे 1265 कोटी ऊपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून राज्याच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. सुंदरनगरमध्ये 44.8 मिलीमीटर (मिमी), शिलारू 43.1 मिमी, जुब्बारहट्टी 20.4 मिमी, मनाली 17 मिमी, शिमला 15.1 मिमी, स्लपर 11.3 मिमी आणि डलहौसीमध्ये 11 मिमी पाऊस झाला. हवामान विभागाने 2 सप्टेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचा यलो अलर्ट जारी केला आहे.
गुजरातमध्ये वादळाची भीती
गुजरातला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. हवामान खात्यानुसार, देशाच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये आणि मध्य भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, ओडिशासह पूर्वेकडील पाच राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण भारतीय राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. तथापि, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह इतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये हवामान सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तयार झालेले आसना वादळ ओमानकडेही वळले आहे. अशा परिस्थितीत गुजरातच्या जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.