बुधवारीही पावसाने गोव्याला झोडपले
रस्त्यांवर झाडे, पाणी आल्याने वाहतुकीत व्यत्यय : वीज तारांवर झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित
पणजी : राज्यात मंगळवारी कोसळलेला पाऊस हा अनेक ठिकाणी आठ इंचापर्यंत जाऊन पोहोचला होता. बुधवारी राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. त्याचबरोबर जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आज व उद्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दि. 24 ते 27 मे दरम्यान येलो अलर्ट जारी केला आहे. गोव्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशीदेखील झोडपून काढले. अनेक भागात जोरदार वृष्टी झाल्याचे वृत्त आहे. गोव्याच्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहे. काही झाठे वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता.
बुधवारीही दिवसभर झोडपले
काल बुधवारी गोव्यात सकाळपासून पाऊस सुरू झाला होता. जरी हा मान्सूनपूर्व पाऊस असला तरी याचा परिणाम पुढील चार दिवस राहणार आहे. आतापर्यंत 27 मे पर्यंतच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मंगळवारी संपूर्ण गोव्याला पावसाने झोपून काढले होते. त्यामध्ये सर्वाधिक आठ इंच पावसाची नोंद म्हापसामध्ये झाली होती. मडगाव व दाभोळी येथे प्रत्येकी साडेसात इंचाची नोंद झाली. केपेमध्ये सात इंच तर जुने गोवे आणि धारबांदोडा तसेच पणजी व मुरगाव या ठिकाणी साडेपाच इंच पावसाची नोंद झाली. सांगे व साखळी येथे प्रत्येकी साडेचार इंच पावसाची नोंद झाली. काणकोण येथे साडेतीन इंच, वाळपईत अडीच इंच पावसाची नोंद झाली होती.
सावधानतेचा इशारा
दरम्यान हवामान खात्याने बुधवारी दुपारी गोव्यासाठी रेड अलर्ट जारी केला. यादरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता. आज व उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारीदेखील राज्यातील अनेक भागात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. केपे या ठिकाणी साडेतीन इंच, मुरगाव सव्वातीन इंच, धारबांदोडा येथे तीन इंच, काणकोण तीन इंच, सांगे दोन इंच, वाळपई दोन इंच, म्हापसा दीड इंच, फोंडा आणि पेडणे येथे पाऊण इंच पावसाची नोंद झाली. पणजीमध्ये दोन इंच पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
अग्निशामक दलाची धावपळ : दोन दिवसांच्या पावसामुळे दलाची उडाली तारांबळ,अनेक घटनांमधून वाचवले लाखो ऊपयांचे नुकसान
राज्यात मंगळवारपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लोकांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोलमडली असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नैसर्गिक संकटामुळे अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या राज्यातील केंद्रांची चांगलीच धावपळ सुरू आहे. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस सतत पाऊस पडल्याने लाखो ऊपयांचे नुकसान झालेले आहे. मंगळवारी 20 रोजी राज्यातील विविध घटनांमधून 30 लाख 10 हजार ऊपयांचे नुकसान झाल्याची नोंद अग्निशमन दलाच्या केंद्राकडे नोंद झालेली आहे. या एकाच दिवसांत दलाच्या अधिकाऱ्यांनी व जवानांनी विविध घटनांमधून 75 हजार ऊपयांची मालमत्ता वाचविली आहे, तर 5 जणांना जीवदान दिलेले आहे. बुधवारीही पावसाने जोर धरल्याने अग्निशामक केंद्राकडे दिवसभरात कॉल येतच होते. दिवसभरात शेकडो कॉल आल्याची नोंद आहे. पणजी राजधानी शहरातही अनेक ठिकाणी पडझड झाली. मंगळवारी 20 रोजी एकूण 22 घटना घडल्या असून, त्यातील सर्वाधिक डिचोली तालुक्यात 5 घटना घडला. फोंडा (4 घटना), जुने गोवे (3), वाळपई (3), कुडचडे (2), पणजी (2), पर्ये (2), काणकोण (1), कुंडई (1), पेडणे (1), पिळर्ण (1), वास्को (1). अशा घटना घडल्या. बुधवारी 21 रोजी तिसवाडी तालुक्यात पडझडीच्या सर्वाधिक 9 घटना घडल्या आहेत. कुंडई (6), पेडणे (5), फोंडा (5), सत्तरी (5), केपे (2), कुंकळ्ळी (2), जुने गोवे (1), पर्वरी (4), वाळपई (5), वास्को (1) आदी पडझडीच्या घटनांची आकडेवारी आहे. बुधवारी 21 रोजी पडझडीच्या घटनांमधून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत दलाकडे त्याची नोंद झालेली नव्हती.