नेपाळमधील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर
कमला नदी दुथडी भरून वाहतेय दरभंगातील 8 गावांमध्ये पाणी शिरले
वृत्तसंस्था/पाटणा
भारताप्रमाणेच नेपाळमध्येही सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. नेपाळमधील पावसामुळे तेथे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून त्याचा फटका बिहारलाही बसला आहे. दरभंगातील कमला बालन नदी ओसंडून वाहत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. नेपाळमधून आलेल्या पुराचे पाणी आठ हून अधिक गावांमध्ये घुसले आहे. हजारो लोक बेटांसारख्या परिस्थितीत राहत असून मदतीची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी येथील स्थानिक लोक आता आपल्या कुटुंब आणि पशुधनासह अन्यत्र स्थलांतरित होत आहेत.
नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसाचे परिणाम आता बिहारमध्ये दिसून येत आहेत. दरभंगा जिह्यातील कमला बालन नदीला पूर आला आहे. घनश्यामपूर ब्लॉकमधील आठहून अधिक गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. बौर, नवतोलिया, बैजनाथपूर, कांकी मुसाहारी, भरसाहा, कैथाही, रसियारी पुनर्वसन टोला, लघमा मुसाहारी आणि जमरी देह टोला ही गावे पुरामुळे गंभीरपणे प्रभावित झाले आहेत. रस्त्यावर तीन ते चार फूटांपर्यंत पाणी साचल्यामुळे मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. लोक बोटींमधून गावांमध्ये ये-जा करत आहेत.
पुरामुळे सुमारे 8,000 लोक प्रभावित झाले आहेत. पिण्याचे पाणी, चारा, धान्य आणि इंधनाची कमतरता आहे. लोक सुरक्षित निवारा आणि प्रशासकीय मदतीची वाट पाहत आहेत. झांझरपूरमध्ये कमला बालन नदी लाल चिन्हापेक्षा दीड मीटर वर वाहत आहे. पुराचे पाणी अनेक सरकारी शाळांमध्येही पोहोचले आहे. बौर कन्या, नवतोलिया आणि रसियारी येथील शाळांमध्ये अभ्यासिका आणि मध्यान्ह भोजन बंद करण्यात आले आहे. भात, मका, केळी आणि भाज्यांची पिके नष्ट झाली आहेत. बरीच शेतजमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासकीय पातळीवरून मदत पुरविली जात असली तरी ती कमी पडत आहे. नऊ बोटी मदतकार्यात गुंतल्या आहेत. गरज पडल्यास अधिक बोटी आणि सामुदायिक स्वयंपाकघरे सक्रिय केली जातील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.