पावसाची उघडीप, भात पेरणीस वेग
गुंजी परिसरात दिवसाकाठी एका ट्रॅक्टरने दहा ते बारा एकर शेतीत भात पेरणीचे उद्दिष्ट
वार्ताहर/गुंजी
गेल्या पंधरा दिवसापासून सुरू झालेला पाऊस सध्या चार दिवसापासून ओसरला आहे. तर दोन दिवस कडक ऊन पडल्याने या भागातील शेतकरी पेरणी करण्यात गुंतला असून सध्या भात पेरणीस वेग आला आहे. मागील आठवड्यात या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शिवारात पाणी भरले होते. त्यामुळे पेरणीसह मशागतीची सर्व कामे ठप्प झाली होती. पेरणी हंगाम मिळण्याची अजिबात शक्यता नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या येथील शेतकरी वर्गात भातपेरणीची धांदल सुरू असून पावसाच्या दहशतीमुळे सर्वच शेतकरी भात पेरणी आटोपण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. जलदगतीने पेरणीसाठी यांत्रिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटरी आणि पाठोपाठ ट्रॅक्टरच्या कुरीने पेरणी सुरू केली असून दिवसाकाठी एका ट्रॅक्टरने दहा ते बारा एकर शेतीत भात पेरणी होत असल्याचे येथील प्रगतशील शेतकरी आणि ट्रॅक्टर ओनर संदीप नाळकर यांनी सांगितले.
खत-भात बियाण्यांचा तुटवडा
सध्या या भागात भात पेरणीस उत्तम हंगाम आला असला तरी येथील कृषी कार्यालयात बियाणांचा तुटवडा भासत आहे. शेतकऱ्यांना मागणी केलेले भात बियाणे मिळत नसल्याने आणि या ठिकाणी आलेले बियाणे निकृष्ट आणि भेसळयुक्त असल्याने येथील शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. कृषी खात्यामध्ये सध्या बी पी टी, आय आर 64, जया आणि आर एन आर या भाताच्या जातीची बियाणे उपलब्ध आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांतून जादा मागणी असलेले अभिलाषा भात बियाणे उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. अभिलाषा भात बियाणे भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आल्यावर येथील कृषी खात्याने दोनशे पोती बियाणे परत पाठविण्यात आले असल्याने या बियाणांचा तुटवडा भासत आहे.
अभिलाषा भात-डीएपी खताचा तुटवडा
वास्तविक गेल्या पाच-सहा वर्षापासून या भागातील बहुतांश शेतकरी अभिलाषा बियाणे वापरत होते. त्यामुळे यावर्षीही या बियाणाला जादा मागणी होती. मात्र सदर बियाणे भेसळयुक्त आणि निकृष्ट निघाल्याने या ठिकाणी सदर बियाणे मिळणे दुरापास्त झाले. येथील कृषी सोसायटीमध्ये डीएपी खतही मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. वास्तविक बहुतांशी शेतकरी हे भात पेरणीच्या वेळी डीएपी खताचा आवर्जून वापर करतात. मात्र सदर खत सोसायटीत आले नसल्याने सदर खताचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. याविषयी येथील कृषी बँकेचे व्यवस्थापक मल्हारी करंबळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब मान्य केली आहे. मात्र सदर खतासाठी आपण खानापूर कृषी कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून अद्याप डीएपी खताचा आपल्याकडे पुरवठा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी खानापूर कृषी अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गुंजी परिसरातील शेतकऱ्यांना डीएपी खताचा त्वरित पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.